राष्ट्रसेवा आणि समर्पणाची भावना आयुष्यभर जपणाऱ्या राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलताई मेढे यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आणि वेदना देणारे आहे. त्यांचा जो काही सहवास मला लाभला त्या सहवासामुळे कृतार्थ झालो. त्यांच्या जगण्यातून मला राष्ट्रभक्तीची, समर्पणाची आणि परोपकाराची प्रेरणा मिळाल्याचे भावोद्गार आमदार संदीप जोशी यांनी काढले.
राष्ट्रसेविका संघाच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिल मावशी मेढे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत आमदार संदीप जोशी यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, प्रमिल मावशी आणि माझी ओळख 1988-89 पासूनचीआहे. मी त्यावेळी पांडे ले-आऊटला राहायचो. तेथे संघाची सायं शाखा नुकतीच सुरू केली होती. प्रमिल मावशीचे बंधू पांडे ले-आऊट येथे राहत असल्याने त्यांचे येणे-जाणे व्हायचे. त्याच ठिकाणी एका स्वयंसेवकाचे कुटुंब राहायचे. त्यांच्याकडे माझे येणे-जाणे असल्याने प्रमिल मावशींची भेट व्हायची.
बाबा आमदार असल्याने त्यांच्याशी परिचय होत्या. प्रमिल मावशीचा साधेपणा मला भावला. अगदी सहजतेने त्या वावरायच्या. संचालिका असताना पायाला भिंगरी लावून त्या फिरत होत्या. अगदी काही वर्षांपर्यंत त्यांचे कार्य असेच सुरू होते. अहिल्या मंदिर कार्यालयातून सुरू असलेल्या कामाचाही मला परिचय होता. आम्ही हक्काने त्यांच्याकडे जायचो आणि आमच्या कार्यक्रमांना बोलवायचो. 2008-09 मध्ये 1857 च्या स्वातंत्र्य समराला 150 वर्ष पूर्ण झाले होते. त्यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या आमच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या होत्या.
त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला होता. मृत्यूनंतर माझा कुठेही फोटो असू नये, श्रद्धांजली सभा घेण्यात येऊ नये अशी इच्छा त्यांनी लिहून ठेवली होती. अशी माणसं कशी तयार होतात, हा प्रश्न तयार होतो. संघाचे संस्कार काय असतात, याची प्रचिती प्रमिल ताईंच्या निमित्ताने येते.
राष्ट्रसेवेचा दीप आज निमाला. प्रमिल ताई यांचे कार्य, संस्कार एक टक्का तरी स्वत:मध्ये उतरवू शकलो, तर मी स्वत:ला भाग्यशाली समजेन, या शब्दात आमदार संदीप जोशी यांनी प्रमिल मावशी मेढे यांना श्रद्धांजली अर्पण केली.