नागपूर : नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने यंदा विक्रमी गर्दी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी साधारण पाच ते सहा लाख बौद्ध अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येथे दाखल होतात. मात्र, यंदा हा आकडा आठ ते नऊ लाखांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलिस व प्रशासनाने विशेष योजना आखली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून २ ऑक्टोबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी नागपूर महानगरपालिका, निटा, राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग, वीज मंडळ आणि पोलिस विभाग यंत्रणा सक्रिय झाली आहे. अनुयायांच्या राहण्या-जेवणाची सोय करण्यासाठी दीक्षाभूमी परिसरातील शाळा तात्पुरत्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
गर्दीवर नियंत्रणासाठी विशेष योजना-
डीसीपी एस. ऋषिकेश रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा १२ ते १५ लाख अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल होऊ शकतात. त्यासाठी सुमारे १२०० पोलीस कर्मचारी व अधिकारी, एसआरपीच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गर्दी नियंत्रणासाठी बंदोबस्त चार सेक्टरमध्ये विभागला गेला आहे. २ डीसीपी, ४ एसीपी आणि शंभर अधिकारी तैनात असून, १०० सीसीटीव्ही कॅमेरे व एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र २०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
अनुयायांची वाढती संख्या-
सध्या देखील बाहेरून येणाऱ्या अनुयायांचा ओघ सुरू झाला आहे. विजयादशमीला पावसाची शक्यता लक्षात घेऊन शहरातील शाळांमध्ये त्यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा दीक्षाभूमीवरील गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघतील, असा अंदाज आहे.
ऐतिहासिक दिवसाची आठवण-
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्रिशरण व पंचशील स्वीकारून लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. त्या ऐतिहासिक प्रसंगाची स्मृती म्हणून दरवर्षी लाखो अनुयायी नागपूरात येतात. यावर्षी या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.एकंदरीत, यंदाच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरातील दीक्षाभूमी अनुयायांच्या उत्साहाने आणि गर्दीच्या व्यवस्थापनामुळे विशेषतः गजबजून जाणार आहे.