
नागपूर : हिंगणा परिसरात २८ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेच्या शोधाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. देवळी पेंढरी परिसरातील एका शेतात महिलेचा सडलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने चेहऱ्यावरून ओळख पटवणे शक्य झाले नाही. मात्र, घटनास्थळी आढळलेल्या कपड्यांवरून हा मृतदेह ७ ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेल्या बाली ऊर्फ मीना रणवीर तेलंग यांचा असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबरच्या रात्री मीना अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्या रात्री एका व्यक्तीशी बोलण्यावरून मीना आणि त्यांचे पती रणवीर यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. वादानंतर पती हॉलमध्ये बसले असताना मीना स्वयंपाकघरात गेल्या. मात्र, काही वेळाने पती स्वयंपाकघरात पोहोचले असता त्या तिथे नव्हत्या. नातेवाइकांनी आणि कुटुंबीयांनी शोध घेऊनही त्यांचा पत्ता लागला नाही. अखेर ७ ऑक्टोबर रोजी हिंगणा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.
दरम्यान, तब्बल २८ दिवसांनंतर देवळी शिवारातील शेतात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सिंगा ऋषिकेश रेड्डी आणि पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अवस्था पाहता नातेवाइकांनाही ओळख पटवता आली नाही. त्यामुळे आता पोलिसांकडून मीना यांच्या आई-वडिलांच्या रक्ताचे नमुने घेऊन डीएनए चाचणी केली जाणार आहे.
सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. डीएनए अहवाल आल्यानंतरच मृतदेहाची ओळख निश्चित होईल, असे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांनी सांगितले. मृतदेह मीनाचाच असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्या मृत्यूमागे घातपात आहे की अन्य काही कारण, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. डीएनए चाचणी आणि शवविच्छेदन अहवालातून या रहस्यमय मृत्यूचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.



