Published On : Sat, Feb 10th, 2018

भाडेपट्ट्यावर दिलेल्या शासकीय जमिनींचा भाडेपट्ट्याचा दर कमी करण्याचा लवकरच निर्णय – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई: भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनींवर असलेल्या गृहनिर्माण सोसायट्या, विश्वस्त संस्था व इतर जमिनींना आकारण्यात येणारे भाडेपट्टे दर कमी करण्यासंदर्भात राज्य शासन लवकरच निर्णय घेणार आहे. तसेच नागरी क्षेत्रातील अकृषिक कर हा रेडिरेकरनच्या ३ टक्के वरून ०.0५ टक्के करण्यात आला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.

आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई व ठाण्यातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आज महसूल मंत्री श्री. पाटील यांची भेट घेतली. यावेळी भाडेपट्ट्याने दिलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारितील शासकीय जमिनींचा भाडे दर कमी करावा, मुंबई उपनगरात लावण्यात आलेला अकृषिक कर कमी करावा, तसेच शासकीय जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ म्हणजेच खुल्या कराव्यात, या मागण्या शिष्टमंडळाने श्री. पाटील यांच्याकडे केल्या. यावर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे महसूल मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी या शिष्टमंडळास सांगितले.

Gold Rate
14 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,200 /-
Gold 22 KT ₹ 93,200 /-
Silver/Kg ₹ 1,16,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

श्री. पाटील म्हणाले की, राज्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असलेल्या शासकीय जमिनी भाडेपट्ट्याने गृहनिर्माण सोसायटी, विविध सार्वजनिक विश्वस्त संस्था व इतर व्यक्ती/संस्थांना दिल्या आहेत. त्याचे भाडे हे शासन हिश्शाच्या 2 टक्के दराने आकारले जाते. या दरामध्ये सवलत देण्याची मागणी रास्त असून गृहनिर्माण सोसायट्या व विश्वस्त संस्थांना दर आकारणी कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच पुनर्विकासात मर्यादा असणाऱ्या जमिनींचा दरही परवडेल असा करण्यात येईल.

श्री. पाटील म्हणाले की, भाडेपट्ट्याने/कब्जे हक्काने दिलेल्या जमिनींवर बांधकामासाठी झालेला विलंब नियमानुकूल करताना आकारण्यात येणारी शास्ती (दंड) हा सध्याच्या दराऐवजी तत्कालीन रेडिरेकनर दरानुसार घेण्याचा तसेच शासकीय जमिनीवरील सदनिका हस्तांतरणामधील शर्तभंग देखील तत्कालीन दरानुसार शास्ती आकारण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे शर्तभंग नियमानुकूल करताना आकारला जाणारा दंड कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

तसेच नागरी क्षेत्रात रेडिरेकनरच्या 3 टक्के दराने अकृषिक कर आकारला जातो. हा कर गेल्या दहा वर्षात स्थगित ठेवण्यात आला होता. आता गेल्या दहा वर्षातील फरकासह हा कर आकारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नोटिसा देण्यात आल्या आहेत. हा कर कमी करण्याचा विचार राज्य शासनाने करून हा अकृषिक कर रेडिरेकरनच्या 3 टक्क्यावरून 0.05 करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अकृषिक कराचा हमी कालावधी पाच वर्षांऐवजी आता दहा वर्ष करण्यात आला आहे. त्यामुळे हा दर आता पुढील पाच वर्षे स्थिर राहणार असल्याची माहिती महसूल मंत्री श्री. पाटील यांनी दिली. तसेच ज्यांना जुन्या दराने नोटिसा आल्या आहेत, त्यांना नव्या दराने दुरुस्त केलेल्या आकारणीच्या नोटिसा पुन्हा पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विविध गृहनिर्माण सोसायट्या व संस्थांना वर्ग दोन म्हणून प्रदान केलेल्या शासकीय जमिनींचा धारणाधिकार वर्ग एक बदलून या जमिनी खुल्या करण्यासंदर्भात महसूल विभागाचे प्रधान सचिव यांच्या समितीने अहवाल तयार केला आहे. यावर निर्णय घेऊन या जमिनींना किती प्रमाणात शुल्क आकारून त्या जमिनी वर्ग एक मध्ये रुपांतरित करायच्या याचा निर्णय व त्याची कार्यपद्धती लवकरच राज्य शासन जाहीर करणार आहे. यामुळे शासकीय जमिनींचे हस्तांतरण, पुर्नविकास, यासाठी वारंवार घ्याव्या लागणाऱ्या परवानग्या, शर्तभंग आदी अडचणी दूर होऊन भाडेपट्टे धारकांना दिलासा मिळणार असल्याचेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Advertisement