| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Feb 10th, 2018

  धनगर आरक्षण अहवाल अंतिम टप्प्यात : आरक्षण कोर्टात टिकण्यासाठी शासन प्रयत्नशील – जलसंधारण मंत्री राम शिंदे

  लातूर: धनगर समाजाचा आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्याबाबत टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स संस्थेमार्फत राज्य शासनाने सर्वेक्षण केलेले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल अंतिम टप्प्यात असून हे आरक्षण कोर्टात टिकून त्याचा लाभ धनगर समाजाला मिळाला पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याची माहिती मृद व जनसंधारण, राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.

  धनगर साहित्य परिषदेमार्फत लातूर येथे आयोजित दुसऱ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनात जलसंधारणमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती संगीता धायगुडे, उद्घाटक ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, खासदार सुनील गायकवाड, माजी खासदार गोपाळराव पाटील, आमदार सुधाकर भालेराव, ॲड. अण्णाराव पाटील उपस्थित होते.

  प्रा. शिंदे म्हणाले की, धनगर जाती आदिवासी जातीमध्ये समाविष्ट करुन त्या प्रवर्गाचे सर्व लाभ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेचा धनगर आरक्षणाबाबतचा सर्वेक्षणाचा अहवाल अंतिम टप्यात आहे.

  धनगर आरक्षणाचा प्रस्ताव न्यायालयात टिकला पाहिजे या दृष्टीने शासन सकारात्मक प्रयत्न करत आहे. तसेच सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याबाबतच्या निर्णयाला मंत्रीमंडळाने मान्यता दिलेली असून धनगर आरक्षण व सोलापूर विद्यापीठाचे नामकरणाबाबत शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

  धनगर साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समाजात वैचारिक जागृती निर्माण होऊन त्याचा एक दबाव गट निर्माण झाला पाहिजे. त्याप्रमाणेच समाजातील समस्यांवर येथे चर्चा होऊन त्या सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. कर्नाटक राज्यातील धनगर समाजाच्या संघटनेप्रमाणे राज्यात संघटना उभी राहिली पाहिजे, असे प्रा. शिंदे यांनी स्पष्ट केले.

  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जलसंधारणाबाबत तसेच साहित्य व कला संवर्धनाबाबत सुमारे 200 वर्षापूर्वी फार मोठे काम केलेले असून आज ह्या संमेलनाच्या माध्यमातून त्यांचा हा वारसा पुढे चालविण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मत ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर यांनी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

  21 व्या शतकातील स्त्रियांनी पुढे येऊन अभिव्यक्त झाले पाहिजे. परिस्थितीला बदलण्याच सामर्थ्य स्त्रीमध्ये असल्याने त्यांनी आपली गुणवत्तेला झळाळी देऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपल पाहिजे, असे आवाहन संमेलनाच्या अध्यक्षा श्रीमती धायगुडे यांनी केले. तसेच इंग्रजी भाषेच्या आक्रमणात आजच्या तरुण पिढीचं वाचन कमी झाले आहे. त्यामुळे तरुण पिढींचा कल पाहून त्याप्रमाणे सहित्य निर्माण झाले तर साहित्य वाचनांकडे ते आकर्षित होऊन मुल्याधिष्ठित समाज निर्माण होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

  आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचा साहित्याच्या दृष्टीने समाज एकत्रीत करुन समाजातील साहित्यिकांना वैचारिक व्यासपीठ मिळवून देऊन सामाजिक एकता निर्माण करण्याचा उद्देश सफल झाल्याचे दिसून येत आहे, असे मत श्रीमती धायगुडे यांनी व्यक्त करुन संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून समाजासाठी जे जे काम करता येईल ते काम पूर्ण क्षमतेने केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष हिंगे यांनी करुन संमेलनाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. तर धनगर साहित्य परिषद अध्यक्ष श्री. शेंडगे यांनी संमेलनाची भूमिका विषद करुन पुढील वाटचालीची माहिती दिली. तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड. पाटील यांनी यथोचित मार्गदर्शन केले. तर पहिल्या धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. सोनवणी हे संमेलन एका समाजापुरते मर्यादित नसून याची व्यापकता मोठी असल्याचे सांगितले. तसेच वैचारिक शक्ती, मोठे ऊर्जा केंद्र हे संमेलन पुढील काळात ठरेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

  विशेष पुरस्कार :-

  धनगर साहित्य परिषदेमार्फत ज्येष्ठ कवी ना.धो.महानोर यांना कवी कालिदास जीवन गौरव पुरस्काराने तर प्रा. संजय सोनवणी यांना राजा हाल जीवन गौरव पुरकाराने सन्मानित केले. पुरस्काराचे स्वरुप, शाल, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व एक लाख रुपये असे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती कव्हेकर यांनी केले तर आभार भाऊसाहेब हाके पाटील यांनी मानले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145