Published On : Mon, May 21st, 2018

फळपिकांचा समावेश करीत या वर्षापासून एकत्रित क्रॉपसॅप योजना राबविण्याचा निर्णय – कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची माहिती

Advertisement

मुंबई: राज्यातील प्रमुख फळ पिके व इतर पिकांवरील कीड रोगांच्या व्यवस्थापनाचे दृष्टीने एकत्रित क्रॉपसॅप योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सन २०१८-१९ पासून सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा, आंबा, डाळिंब, केळी, मोसंबी, संत्रा व चिक्कू या प्रमुख पिकांवरील कीड व रोगाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने एकत्रित कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजना (क्रॉपसॅप) राबविण्यासाठी ४१ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे,अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या प्रमुख पिकावरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने सन २००९-१० ते २०१२-१३ दरम्यान राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून आणि सन २०१३-१४ पासून नियमित राज्य योजनेतून कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राबविण्यात येत आहे. त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन क्रॉपसॅप योजनेच्या धर्तीवर आंबा, डाळिंब, केळी, मोसंबी, संत्रा व चिक्कू या प्रमुख फळ पिकांसाठी सन २०११-१२ पासून राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून हॉर्टसॅप प्रकल्प राबविण्यात येत आहे.

Gold Rate
28 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,64,400/-
Gold 22 KT ₹ 1,52,900 /-
Silver/Kg ₹ 3,72,000 /-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

क्रॉपसॅप व हॉर्टसॅप प्रकल्पांची एकसमान कार्यपद्धती विचारात घेऊन दोन स्वतंत्र योजना न राबविता फळ पिकांचा क्रॉपसॅप योजनेमध्ये समावेश करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. क्रॉपसॅप योजनेच्या राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत चर्चा होऊन त्यास प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या प्रकल्पांतर्गत पिकांवरील कीड व रोगाचे विविध टप्प्यावर काटेकोरपणे व नियमितरित्या परीक्षण व त्यासंदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व सल्ला प्राप्त करुन शेतकऱ्यांना कालमर्यादेत मार्गदर्शन करण्यासंदर्भात सुधारित सूचना करण्यात आल्या आहेत.

क्रॉपसॅप योजनेमध्ये सोयाबीन, कापूस, भात, तूर, हरभरा या प्रमुख पिकांसह आंबा, डाळिंब, केळी, मोसंबी, संत्रा व चिक्कू या प्रमुख फळ पिकांचा समावेश राहील. सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या पिकांसाठी क्रॉपसॅप योजनेची अंमलबजावणी कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सहभागाने करण्यात यावी व त्याकरिता पुणे येथील राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने विकसित केलेल्या मोबाईल ॲप्लिकेशन व संगणक प्रणालीचा वापर करण्यात यावा. सदर योजनेकरिता विकसित करण्यात आलेल्या संगण्क प्रणालीमध्ये कृषि सहायक व कृषि पर्यवेक्षक यांची स्काऊट म्हणून व मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी आणि जिल्हा कृषि अधिकारी यांची त्यांच्या अधिनस्त कार्यक्षेत्रासाठी पर्यवेक्षकीय अधिकारी म्हणून नोंदणी करण्यात यावी व त्यांना कीड व रोग सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात यावी.
योजनेच्या नियोजन व संनियंत्रणासाठी राज्य पातळीवर कृषि आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे.

क्रॉपसॅप योजनेंतर्गत पिकांवरील प्रमख कीड व रोगांचे सर्वेक्षण करुन त्यांच्या व्यवस्थापनाबाबत मोबाईल ॲपद्वारे व एसएमएसद्वारे शेतकऱ्यांना सल्ले देण्यात यावेत.

संबंधित पिकाच्या विकासाच्या विविध महत्वपूर्ण टप्प्यावर कीड व रोगाचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीवर पोहोचण्यापूर्वी संबंधित नेमून दिलेल्या गावातील पिकांचे नमुने घेऊन त्याची तपासणी व सर्वेक्षण करावे. त्याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व सल्ला प्राप्त करुन त्यासंदर्भात तात्काळ संबंधित पीक क्षेत्राच्या गाव व तालुका स्तरावर शेतकऱ्यांना आवश्यक सल्ला मोबाईल, एसएमएसद्वारे देण्याची व सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र सभा, बैठका व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्याची जबाबदारी ही कृषि सहाय्यक व कृषि पर्यवेक्षक यांची राहील. यानुसार गावपातळीवर कार्यवाही नियमितपणे होत असल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी ही मंडळ कृषि अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी यांची असेल, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.
००००००

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement