नागपूर : दुष्कर्मामुळे गर्भवती झालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन पीडितेला गर्भसमापनाची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. सुमारे २८ आठवडे ६ दिवसांचा गर्भ असूनही वैद्यकीय मंडळाच्या अनुकूल अहवालानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला.
न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. पीडितेने वडिलांच्या माध्यमातून गर्भसमापनासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. सुरुवातीच्या वैद्यकीय तपासणीत गर्भसमापनासाठी ती योग्य नसल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, १७ सप्टेंबर रोजी झालेल्या पुनर्तपासणीनंतर वैद्यकीय मंडळाने पीडिता शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या गर्भसमापनासाठी सक्षम असल्याचा अहवाल दिला.
पीडितेची इच्छा, तिची मानसिक अवस्था, शारीरिक स्वायत्तता आणि प्रतिष्ठा यांचा विचार करून न्यायालयाने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला आवश्यक वैद्यकीय खबरदारी घेत गर्भसमापनाची प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, गुन्ह्याच्या तपासासाठी पीडिता आणि गर्भाशी संबंधित आवश्यक जैविक नमुने घेऊन DNA पुरावे सुरक्षित ठेवण्याचे निर्देश कोराडी पोलिसांना देण्यात आले आहेत. वैद्यकीय प्रक्रिया करण्यापूर्वी पीडिता आणि तिच्या पालकांकडून आवश्यक संमती घेण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.





