अमरावती : शहरातील राजकीय वातावरण तापवणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. माजी खासदार नवनीत राणा यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे. ही धमकी अमरावती पोलिसांच्या कंट्रोल रूमवर फोन करून देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
राजापेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी एका अज्ञात व्यक्तीने कंट्रोल रूमवर फोन करत नवनीत राणा यांना ठार मारण्याची धमकी दिली. हा फोन अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांनी कोणताही विलंब न करता कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.
या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देणारी व्यक्ती कोण आहे, तिने फोन कुठून केला आणि या धमकीमागचा नेमका हेतू काय आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. कंट्रोल रूमवर थेट आलेला फोन असल्याने हा प्रकार अतिशय संवेदनशील मानला जात आहे.
पोलिस कॉल डिटेल्स आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेत असून, लवकरच संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे अमरावतीतील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ हालचाली केल्या असून नवनीत राणा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन आवश्यक खबरदारीचे उपाय अमलात आणण्यात आले आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, धमकी देणारी व्यक्ती समोर आल्यानंतरच संपूर्ण कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू असून शहरातील राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.









