नवी दिल्ली : बँक कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यामुळे आता देशव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी देशभरातील बँक कर्मचारी 27 जानेवारी रोजी एकदिवसीय संपावर जाणार आहेत.
हा संप युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आला असून, सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँक कर्मचारी मोठ्या संख्येने यात सहभागी होणार आहेत. संघटनांचा आरोप आहे की गेल्या दोन वर्षांपासून सरकारकडून केवळ आश्वासनं दिली जात असून, प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी होत नाही.
बँक कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एलआयसी, रिझर्व्ह बँक, नाबार्ड आणि सेबी यांसारख्या वित्तीय संस्थांमध्ये आधीच पाच दिवसांचा आठवडा लागू आहे. मात्र, बँक कर्मचाऱ्यांनाच यापासून वंचित ठेवलं जात असल्याने असमानतेची भावना निर्माण झाली आहे.
2010 मध्ये दोन शनिवार अर्धदिवस कामकाज बंद करून उर्वरित दोन शनिवार पूर्ण सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुढील द्विपक्षीय करारांमध्ये उर्वरित दोन शनिवारही सुट्टी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तरीदेखील सरकारकडून कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत.
UFBU च्या मते, पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्यास कर्मचाऱ्यांचा ताण कमी होईल आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल. मात्र, मागण्यांकडे दुर्लक्ष सुरू राहिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.









