
अकोला: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल अकोट तालुक्यातील मोहाळा गावात त्यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हिदायत पटेल यांच्या निधनानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात नातेवाईक, समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवण्याचा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे.
या हल्ल्याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला ‘खुनाचा प्रयत्न’ आणि कट रचल्याचे कलम लावण्यात आले होते. मात्र, आता हिदायत पटेल यांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणात खुनाचे कलम वाढवले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोठ्या राजकीय नेत्यांची नावे गुन्ह्यात पटेल कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींच्या यादीत प्रभावी राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. यात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे माजी काँग्रेस नगराध्यक्ष संजय बोडखे, तसेच काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे यांची नावे आहेत. याशिवाय प्रत्यक्ष हल्ला केल्याचा आरोप असलेला उबेद पटेल आणि आणखी एक व्यक्ती आरोपी आहेत.
हल्लेखोराला अटक हल्ल्यानंतर मुख्य आरोपी उबेद पटेल फरार झाला होता. मात्र, अकोट तालुक्यातील पणज गावातून रात्री उबेद पटेलला पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, गुन्ह्यात राजकीय वजनदार नावे असल्याने अकोला जिल्ह्यातील राजकारणात तीव्र खळबळ उडाली आहे.
हिदायत पटेल हत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता असून, पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








