
नागपूर : नागपूर महानगरपालिकेची आगामी निवडणूक निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयोगाने नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयातील अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक महानगरपालिकेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात येत असून, त्याचाच भाग म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. खोडे-चवरे यांना सहाय्य करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी दर्जाच्या निवडणूक निरीक्षकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचे अप्पर जिल्हाधिकारी श्री. संतोष थिटे यांची नागपूर महानगरपालिकेसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांसोबत निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा केली. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निर्भय, मुक्त व पारदर्शक ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच निवडणुकीदरम्यान कार्यरत असलेल्या निगराणी पथकांच्या कामकाजाचीही माहिती त्यांनी घेतली.
दरम्यान, नागपूर महानगरपालिकेसाठी मुख्य निवडणूक निरीक्षकांचे कार्यालय रवी भवन येथील कॉटेज क्रमांक २१ येथे स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.








