नागपूर : जिल्हा न्यायालय परिसरात आज (८ सप्टेंबर) दुपारी घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पॉक्सो कायद्यातील आरोपी महाजन याचा मृत्यू न्यायालयातील बाथरूममध्ये झाला. अचानक कोसळल्याने जागेवरच त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त सुनीता मेश्राम यांनी ”नागपूर टुडे”शी सांगितले की, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला असून, हृदयविकाराचा झटका हा मृत्यूचे प्राथमिक कारण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सदर आरोपी महाजन गेल्या अनेक वर्षांपासून न्याय मिळावा यासाठी न्यायालयीन लढा देत होता. मात्र, वारंवार तारखा मिळत राहिल्याने तो प्रचंड तणावाखाली होता. न्यायालय परिसरातच त्याचा मृत्यू झाल्याने प्रकरण अधिकच संवेदनशील झाले आहे.
या घटनेमुळे न्यायप्रक्रियेत होणारा विलंब आणि व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. सामान्य नागरिकाला वेळेवर न्याय मिळावा यासाठीच तो न्यायालयाची पायरी चढतो. पण सुनावणी सतत लांबत असल्याने आणि प्रकरणे वर्षानुवर्षे तशीच प्रलंबित राहिल्याने लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
न्यायालयाच्या परिसरातच एका आरोपीचा मृत्यू झाल्याने “व्यवस्था नागरिकांसाठी किती उत्तरदायी आहे?” हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समाजापुढे उभा राहिला आहे.