नागपूर : शहरातील वाहतूक शाखेचे नवे पोलीस उपयुक्त (डीसीपी ट्राफिक) म्हणून लोहित मतानी यांनी आजपासून अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारताच त्यांनी नागपूरच्या वाढत्या वाहतूक समस्यांकडे लक्ष केंद्रित करण्याची भूमिका मांडली.
नवीन डीसीपी यांनी स्पष्ट केलं की, शहरातील वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे ट्राफिक जाम आणि अपघातांचं प्रमाण वाढत आहे. रस्त्यावर होणाऱ्या चुकीच्या पार्किंगमुळे अडथळा निर्माण होतो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं.
‘ड्रंक अँड ड्राईव्ह’वर कठोर कारवाई केली जाणार असून, हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. “वाहतूक नियम हे प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आहेत. कृपया ते पाळावेत,” असं आवाहन त्यांनी नागपूरकरांना केलं.
शहरातील रस्त्यांवर सुरू असलेल्या बांधकामामुळे अपघातांची संख्या वाढली असून, ब्लॅक स्पॉट्स (अपघात प्रवण भाग) ओळखून तिथे आवश्यक ती सुधारणा केली जाईल, असं मतानी यांनी सांगितलं.
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस विभाग सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे, वाहतूक नियमांचे पालन करावे, अशी विनंतीही डीसीपी लोहित मतानी यांनी केली.