मुंबई: राज्याच्या पोलीस महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती होणार आहे. सध्या सतीश माथूर यांच्याकडे या पदाची जबाबादारी आहे. मात्र, जून महिन्याच्या अखेरीस ते निवृत्त होत आहेत. त्यानंतर दत्ता पडसलगीकर महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकार करणार आहे. सध्या पडसलगीकर यांच्याकडे मुंबईचे आयुक्तपद आहे.
सेवाज्येष्ठतेनुसार सतीश माथूर जून अखेरीस निवृत्त होणार आहे. त्यानंतर पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी दत्ता पडसलगीकर सांभाळणार आहे. सेवाज्येष्ठतेनुसार पडसलगीकरदेखील ऑगस्टअखेरीस निवृत्त होतील. मात्र त्यांची 36 वर्षांची सेवा लक्षात घेऊन त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत पडसलगीकर महासंचालकपदी राहतील.
मात्र, त्यांनतर ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती होऊ शकते. सिंग यांनी गेल्या तीन वर्षांत ठाण्यात चांगली कामगिरी बजावली आहे. तर राज्याच्या महासंचालकपदाचा कारभार संजय बर्वे पाहणार आहे. बर्वे हे अतिशय कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. बर्वे पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत.
संजय बर्वे यांनाही ज्येष्ठ असलेले सुबोध जयस्वाल हे सध्या केंद्रीय सेवेत गुप्तचर विभागात (प्रतिनियुक्तीवर) कार्यरत असून ते पुन्हा महाराष्ट्रात परतण्याची शक्यता नाही. त्यामुळे संजय बर्वे यांचा मुंबईचा आयुक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
