Published On : Fri, Oct 29th, 2021

डिजिटल फ्रेन्डशिप’मधून तोंडघशी पडण्याचा धोका : अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.

अनोळखिंशी संवाद महागात, एकाकीपणा घालवण्याचा मोह आवरा.

नागपूर: एकाकीपणा घालविण्याच्या मोहात सोशल मिडियावर अनोळखी व्यक्तीशी ‘डिजिटल फ्रेन्डशिप’चा पर्याय निवडणारे भविष्यात तोंडघशी पडण्याचाधोका निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षात आर्थिक फसवणूक, सेक्सॅाटर्शन, ब्लॅकमेलिंग, सायबर बुलिंगसारख्या घटनांनी अनेकांनी नुकसान करून घेतले. फेसबूक, ट्वीटर, इन्स्टाग्राफवरील चॅट रुम्स संवादातून व्यक्तिगत माहिती देते महागात पडण्याची शक्यता बळावली आहे.

एकेकाळी घरातील वडीलधारी मंडळी नेहमीच अनोळखी व्यक्तीशी बोलू नका, अनोळखी व्यक्तिला आपली व्यक्तीगत माहिती देऊ नका, असा सल्ला देत होते. आता सोशल मिडिया व सायबर युगात वावरताना हाच कानमंत्र मोलाचा ठरणार आहे. सोशल माध्यमावर ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’च्या मोहात अडकून शहरातील नेटकऱ्यांनी आर्थिक नुकसान तसेच मनस्ताप ओढवून घेतल्याचे सोशल मिडिया तज्ञ् व विश्लेषक अजित पारसे यांनी नमुद केले. सायबर गुन्ह्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात २०१९ मध्ये १२६ तर २०२० मध्ये २०० च्या आसपास सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. ही केवळ शासकीय आकडेवारी असून पोलिस स्टेशनपर्यंत तक्रार घेऊन न जाणाऱ्यांचेही प्रमाण मोठे आहे. त्यांना कायम ब्लॅक मेलिंग व मनस्तापाला पुढे जावे लागत आहे. देशात मागील वर्षात ५० हजारावर सायबर गुन्हे घडले. यातील बहुतांश गुन्हे ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’चा धोका न ओळखल्यामुळे घडल्याचे पारसे यांनी स्पष्ट केले.

सायबर युगात वावरताना उठ सूठ कुणाचीही फ्रेंडशिप करणे आणि आपली वैयक्तिक माहिती शेअर केल्यानेच हे गुन्हे घडल्यास स्पष्ट झाले आहे. समाजात अनेकजण एकाकीपणाने पछाडलेले असून ते ‘डिजिटल फ्रेंडशिप’चा पर्याय निवडताना दिसून येत आहे. सोशल मिडीयावर असंख्य ‘चॅट रुम्स’ असून काही निःशुल्क तर काही शुल्क देऊन खरेदी केल्या जातात. अनेक ‘चॅट रुम्स’ ओळख जाहिर करत नसल्याचा दावा करतात. इथेच तोल सुटतो आणि लैंगिक विषयावर खुला संवादाचा मार्ग मोकळा झाल्याचा भ्रम चॅट करणाऱ्यांना होत असल्याचेही पारसे म्हणाले. बजाजनगर पोलिस स्टेशन हद्दीत एका जेष्ठ नागरीकाची अशीच फसवणूक झाली. एकटेपणा घालवण्यासाठी ते विदेशात राहणाऱ्या तरुणीशी चॅट करत होते. ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’ या प्रकारामुळे त्यांची ७५ हजारांची फसवणूक झाली. असे अनेक गुन्हे घडत असल्याने सावध होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सोशल मिडीयावर ‘टॉक टू अ स्ट्रेन्जर’ धोका वेळीच ओळखणे गरजेचे आहे. चॅटरुम्समघून काही वेळा मनोरंजन किंवा मानसिक आधार मिळू शकतो. पण देशातील सायबर गुन्हेगारीचं विश्लेषण केल्यास यातून बऱ्याचदा धोका होण्याची शक्यता असते. चॅट रुम्समधून संवादातून त्या प्रदर्शनाचा मोह होतो अन् ते रेकॉर्ड करून युजर्सला फसविले जाते. त्यामुळे धोका ओळखून पावलं उचलावी. आभासी जगात वावरताना सावध राहण्याची गरज आहे.

– अजित पारसे, सोशल मीडिया तज्ञ् व विश्लेषक.
www.ajeetparse.com