| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Apr 3rd, 2018

  28-29 ला हैद्राबाद हाऊस येथे द-प.चे समाधान शिबिर

  नागपूर: दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात येणार्‍या सर्व प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याच्या दृष्टीने येत्या 28 व 29 एप्रिल असे दोन दिवस हैद्राबाद हाऊस सिव्हिल लाईन्स येथे समाधान शिबिर घेण्यात येत असून 9 एप्रिलला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कामकाजाचे उद्घाटन होणार आहे.

  हैद्राबाद हाऊस येथे या शिबिराच्या तयारीच्या दृष्टीने आज एक बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरसेवक उपस्थित होते. तसेच भाजपा नेते प्रा. राजीव हडप, मु‘यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, शशांक दाभोळकर व अन्य उपस्थित होते. या शिबिरासाठी प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील प्रत्येक घराशी संपर्क करून त्या नागरिकांची स्थानिक स्तरावर प्रलंबित असलेली कामे घेऊन येणे व संबंधित अधिकार्‍यांकडून ती सोडवून घ्यायची आहेत. तसेच अधिकार्‍यांनी प्रभागातील नागरिकांशी संपर्क करून नागरिकांच्या समस्या आणि त्यांची कामे करायची आहेत. यात व्यक्तिगत स्वरूपाची कामे असतील त्या समस्याही सोडवायच्या आहेत.

  नागरिकांच्या अर्जानुसार त्यांना लागणारी व सहजपण उपलब्ध होणारी प्रमाणपत्रे लगेच देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शासनाच्या 18 विभागाचे स्टॉल आणि संबंधित अधिकारी येत्या 9 एप्रिलपासून हैद्राबाद हाऊस येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या शिबिरासाठी 9 ते 18 एप्रिलदरम्यान हैद्राबाद हाऊस येथे अर्ज स्वीकारण्यात येणार असून आलेले अर्ज संबंधित विभागाकडे त्याच दिवशी पाठविण्यात येतील. 19 ते 25 एप्रिल दरम्यान संबंधित विभागाकडे पाठविण्यात आलेल्या अर्जावर विभागाकडून कारवाई केली जाईल.

  मनपा, नासुप्र, पुरवठा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, नगर भूमापन, वीज मंडळ, संजय गांधी निराधार योजना, जिल्हा उद्योग केंद्र, तहसिल कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, महिला बाल कल्याण, समाजकल्याण, आदिवासी विभाग, जातपडताळणी, म्हाडा, महाराष्ट्र कामगार मंडळ, मिहान, मतदार नोंदणी, सार्वजनिक आरोग्य, पोलिस मित्र, तंटामुक्त समिती, दक्षता समिती अशा सर्व विभागांचा या शिबिरात समावेश करण्यात आला आहे.

  अर्जदारांसाठी महत्त्वाचे
  अर्ज/तक‘ार 3 प्रतींमध्ये असावी. अर्जाच्या प्रथम पृष्ठावर अर्ज ज्या विभागाशी-कार्यालयाशी संबंधित आहे त्याचे नाव ठळकपणे नमूद करावे. संबंधित विभागाकडून पूर्वीचा पत्रव्यवहार असल्यास त्याची प्रत जोडावी. अर्ज-तक‘ार व्यक्तिगत स्वरूपाची असावी. एका अर्जात एकाच विभागाशी संबंधित तक‘ार असावी. नोकरी-बदली संदर्भात अर्ज करण्यात येऊ नये. हे समाधान शिबिर दक्षिण पश्चिम मतदारसंघातील नागरिकांकरिता असल्यामुळे फक्त येथील मतदारसंघातील नागरिकांनी अर्ज-तक‘ारी सादर कराव्यात.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145