Published On : Tue, Apr 3rd, 2018

वर्षभरात १४ लाख वीज ग्राहकांनी लाभ घेतला

Mahavitaran Logo Marathi
नागपूर: ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी महावितरण कंपनीकडून आठ वर्षपूर्वी राज्यातील घरगुती, वाणिज्यिक ,शेती पम्प वीज ग्राहकांसाठी वीज देयकाचे पैसे बिल भरणा केंद्रावर न जात थेट ऑन लाईन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली . या सुविधेचा लाभ मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक घेत असल्याचे आढळून आले आहे. नुकत्याच संपलेल्या २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात नागपूर परिमंडलात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील १४ लाख वीज ग्राहकांनी २३८ कोटी रुपयांचा महसूल ऑनलाईन पद्धतीचा वापर करून महावितरणच्या तिजोरीत जमा केला आहे.

नागपूर शहर मंडल कार्यालय अंतर्गत येणाऱ्या ५ लाख ९० हजार ९७९ वीज ग्राहकांनी ११४ कोटी ८८ लाख रुपयांचा तर नागपूर ग्रामीण मंडल कार्यालय अंतर्गत येणाऱ्या ४ लाख ९ हजार ७३० वीज ग्राहकांनी ६५ कोटी रुपयांचा भरणा ऑनलाईन पद्धतीने केला आहे.वर्धा जिल्ह्यातील ४ लाख ९८ हजार वीज ग्राहकांनी ५८ कोटी ५५ लाख रुपयांचा भरणा ऑन लाईन पद्धतीने केला आहे. नागपूर परिमंडलात एकूण वीज ग्राहकांची संख्या ९ लाख ३४ हजार आहे.

अगोदर वीज देयकाचा भरणा करण्यासाठी वीज बिल भरणा केंद्र, पोस्ट ऑफिस, सहकारी पत संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक,खाजगी बिल भरणा केंद्र या परंपरागत पद्धतीचा वापर वीज ग्राहक करीत होते. बदलत्या काळासोबत महावितरणने कात टाकली आणि आधुनिकतेची कास धरत वीज ग्राहकांना थेट घर बसल्या वीज भरणा करण्याची सोया उपलब्ध करून दिली. इंटरनेट अथवा स्मार्ट फोनच्या माध्यमातून महावितरणचा वीज ग्राहक जगाच्या कोठल्याही कोपऱ्यातून आता आपल्या देयकाची रक्कम अदा करू शकतो.

यासाठी वीज ग्राहकाला www.mahadiscom.in या महावितरणच्या संकेत स्थळावर गेल्यावर ऑन लाईन पद्धतीने देयकाची भरणा करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. येथे वीज ग्राहकाने आपला ग्राहक क्रमांक आणि उप विभागाचा सांकेतिक क्रमांक टाकावा . वीज ग्राहकाला आता त्याच्या चालू देयकाची प्रत दिसू लागेल. येथे पे नाऊ येथे बटन दाबल्यावर पैसे क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड, ऑन लाईन बँकिंग पद्धतीने भरणार याची माहिती विचारल्या जाते. नंतर दिलेल्या सूचनांचे पालन करावे. पैसे भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर वीज ग्रहाची इच्छा असल्यास त्याची प्रत काढून ठेऊ शकतो. पैसे भरणा केल्यावर वीज ग्राहकाला पैसे भरणा केल्याचा संदेश नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर येतो. यामुळे देयकाची प्रत प्रिंट काढण्याची गरज नाही.

वीज देयकाची रक्कम थकबाकीच्या राहिल्यास महावितरणकडून वीज पुरवठा खंडणीत करण्याची कारवाई करण्यात येते. सध्या उन्हाच्या झळा बसू लागल्याने उन्ह्याळ्यात वीज पुरवठा खंडित झाल्यास उकाड्याचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी वीज ग्राहकांनी भर उन्हात वीज केंद्रावर रांगेत उभे राहण्यापेक्षा ऑन लाईन पद्धतीने देयकाची भरणा केल्यास उन्हापासून होणार त्रास वाचणार आहे .