Published On : Wed, Sep 6th, 2017

पीओपी मूर्तींवरील प्रक्रियेतून तयार होणार ‘सायकल ट्रॅक’

Advertisement

नागपूर: जनजागृतीनंतरही होणाऱ्या पीओपी मूर्तींवर आता नीरीने तोडगा काढला आहे. मूर्ती विसर्जन करण्यात येणाऱ्या पाण्यात रसायने मिळवून त्यातून तयार होणाऱ्या लगद्यापासून सायकल ट्रॅक तयार करण्याची संकल्पना ‘नीरी’ने मांडली आहे. या संकल्पनेचा शुभारंभ बुधवारी (ता. ६) सक्करदरा विसर्जन स्थळावर करण्यात आला.
यावेळी नीरीचे वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनागर, नगरसेवक पिंटू झलके, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, लकडगंजचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव, धरमपेठचे झोनल अधिकारी टेंबेकर, उपअभियंता सचिन रक्षमवार उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सक्करदरा तलाव परिसरात मनपातर्फे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावातील पाण्यात अमोनियम बायकार्बोनेट मिसळवून या प्रकल्पाचा शुभारंभ केला.

अशी राहील प्रक्रिया

पाण्यामध्ये अमोनियम बायकार्बोनेट मिसळल्यानंतर त्यात पीओपी मूर्ती पूर्णत: विरघळते. त्यातून कॅल्शियम कार्बोनेट आणि अमोनियम सल्फेट असे दोन रसायने तयार होतात. कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग बांधकामात होतो तर अमोनियम सल्फेटचा उपयोग खत म्हणून करता येतो.

नीरी परिसरात होणार ‘सायकल ट्रॅक’

कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करून नीरी परिसरात सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. नीरीच्या मुख्य द्वारापासून वसंतनगरमार्गे दीक्षाभूमीपर्यंत हा सायकल ट्रॅक राहील. तर अमोनियम सल्फेटचा उपयोग खत म्हणून नीरी परिसरात असलेल्या झाडांसाठी करण्यात येणार आहे. नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.