नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव आणि पारंपरिक ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाच्या ताब्यात राहणार, यावर निर्णय देणारी महत्त्वाची सुनावणी येत्या १४ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर, ठाकरे गटाने त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही याचिका तब्बल दीड वर्षांपासून प्रलंबित होती. अखेर या प्रकरणाची नोंद सर्वोच्च न्यायालयाच्या दोन क्रमांक कोर्टात झाली असून, न्यायमूर्ती सूर्या कांत आणि न्यायमूर्ती जोयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
ठाकरे गटाची मागणी- ‘राष्ट्रवादी’प्रमाणेच निर्णय हवा-
ठाकरे गटाने आपल्या याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला दिला आहे. राष्ट्रवादी प्रकरणात अजित पवार गटाला चिन्ह तात्पुरते वापरण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, त्यांना जाहिरातीत स्पष्ट करणे बंधनकारक होते की हे चिन्ह अंतिम निर्णयाच्या अधीन आहे.
ठाकरे गटानेही अशीच मागणी करत, सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला तात्पुरते आदेश द्यावेत आणि त्यांच्या प्रचारात स्पष्ट खुलासा करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे.
महत्त्वपूर्ण राजकीय प्रभाव-
१४ जुलै रोजी होणारी ही सुनावणी राज्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निर्णायक ठरणार आहे. शिवसेना नाव व चिन्हाचा अंतिम ताबा ठरल्यास राजकीय समीकरणे पूर्णतः बदलू शकतात.
या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असून, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षाचा टोकाचा टप्पा म्हणूनही या सुनावणीकडे पाहिले जात आहे.