
नागपुर– शहरात क्राइम ब्रँच युनिट क्रमांक ५ ने मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही छापेमारी करण्यात आली असून सुमारे ५ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्रेमनगर, नारायणपेठ परिसरातील एका भाड्याच्या खोलीवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेल्या गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
या कारवाईदरम्यान नयन केसरवाणी या आरोपीला घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले. आरोपीने हा सर्व प्रतिबंधित माल भाड्याच्या खोलीत साठवून ठेवत अवैध विक्री करण्याची तयारी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आर्थिक फायद्यासाठी आरोपी हा बेकायदेशीर व्यवसाय करत असल्याचेही उघड झाले आहे.
महाराष्ट्र सरकारने गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वाहतुकीवर पूर्णतः बंदी घातलेली असताना देखील आरोपी हा कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी आरोपीविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी त्याला शांतीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नागपुरात अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.








