Published On : Fri, Feb 7th, 2020

शेतकऱ्यांसाठी रिसोर्स बँक तयार करणार -कृषीमंत्री दादाजी भुसे

Advertisement

· प्रत्येक कार्यालयात सन्मान व मार्गदर्शन केंद्र

· शेतकऱ्यांशी थेट संवाद वाढविण्यावर भर

· वनामतीला प्रशिक्षण व संशोधन संस्थेचा दर्जा

नागपूर: शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची माहिती उपलब्धकरुन देण्यासोबतच राज्यातील कृषी संशोधन व प्रगतीशील शेतकऱ्यांनी केलेल्या विविध उपक्रमांची माहिती एकत्र उपलब्ध करुन देण्यासाठी ‘रिसोर्स बँक’ तयार करण्यात येणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केली.

शेतकऱ्यांची कृषी उद्योजकता वाढीस लागण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी कृषी विभागाने शेतीच्या सक्षमीकरणासाठी शेतकऱ्यांशी संवाद वाढवावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली वनामतीच्या कृषी विषयक उपक्रमाचा तसेच कृषी विषयक व योजनांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी तथा वनामती संचालक रविंद्र ठाकरे, कृषी विद्यापीठाचे संचालक दिलीप मानकर, सहसंचालक रविंद्र भोसले, सुभाष नागरे, कृषी विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.डी.एम.पंचभाई,वनामतीचे अपर संचालक डॉ. अर्चना कडू, सी.पी.टी.पी.च्या संचालक श्रीमती सुवर्णा पांडे आदी उपस्थित होते.

कृषी विभागाच्या विविध शेतविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी, तसेच त्यांच्या शेतीविषयक प्रश्नांबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी शेतकऱ्यांसोबत संवाद वाढवून त्यांच्या अडी-अडचणी समजून घेण्याची सूचना करताना कृषीमंत्री श्री. दादाजी भुसे म्हणाले की, शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता पेरण्याचे महत्वाचे कार्य कृषी विभागाचे असल्यामुळे अधिक संवादी राहने आवश्यक आहे. शेतकऱ्यांना एका छताखाली कृषी सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देवून प्रत्येक तालुका, उपविभागीय तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘सन्मान आणि मार्गदर्शन केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतिविषयक प्रश्नांबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

प्रभावी तांत्रीक मनुष्यबळ व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या क्षमता बांधणीसाठी वनामती व राज्यातील इतर सात रामेती संस्था यांच्या सोयी-सुविधांचे सक्षमीकरण करणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या जीवनात बदल करण्याला प्राधान्य असल्याचे सांगतांना कृषीमंत्री म्हणाले की, रिसोर्स बँकेच्या माध्यमातून कृषी संशोधन, प्रगतीशील शेतकऱ्यांचे अनुभव रिसोर्स बँकेच्यामाध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होतील. ही माहिती उत्पादन शेती करतांना सहाय्यभूत ठरेल. कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरु केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक येणाऱ्या अडचणी सोडविणे सुलभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कृषी विभाग हा शेतकऱ्यांसोबत आहे असा विश्वास निर्माण करण्यासाठी या विभागातील विविध शाखा एकत्र काम करतील, कृषीला उद्योगाचा दर्जा देण्याच्या दृष्टीने भाजीपाला, फळबाग स्त्रोत्र वाढविणे, शास्त्रोक्त पध्दतीने सिंचन तसेच उतपादीत मालाला बाजारपेठ निर्माण करण्याला प्राधान्य असल्याचे यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे यानी सांगितले.

यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले यांनी शेतीला व्यवसाय अधिक फायदेशिर व्हावा यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे गटशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबविणे ‘थीक टँक’ म्हणून दिशा व धोरण राबविण्यासाठी वनामती या संस्थेला अधिकार देण्यात येतील, असेही यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी प्रारंभी स्वागत करुन वनामती तर्फे कृषी उत्पादन, नियाजन, निर्यात आदी उपक्रमाची माहिती दिली. या संस्थेमार्फत शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना संदर्भात प्रशिक्षण व प्रत्यक्ष अंमलबजावणीला प्राधान्य देण्यात आले आहे. संत्र्यासह, फळे व भाजीपाला निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी नोंदणी तर प्रशिक्षण सुरु आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना, अनुदानाचे मापदंड, प्रधानमंत्री पीक विमा योजना, फळबाग योजना, कृषी यांत्रिकीकरण, गाव तेथे गोदाम, प्रत्येक गावात कृषी सहाय्यता कार्यालय आदी विषयावर सादरिकरण करण्यात आले.

वनामती या संस्थेने गटशेतीच्या योजनेचे मुल्यांकन करुन ही योजना अधिक सक्षम करण्या संदर्भात अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केल्यात.

यावेळी नागपूर व अमरावती विभागातील कृषी विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ उपस्थित होते.