Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Feb 7th, 2020

  ‘एक दिवस शेतावर’ उपक्रम राबवा – दादाजी भुसे

  कृषी मंत्र्यांच्या हस्ते प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार

  नागपूर: शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यासोबतच त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘एक दिवस शेतावर’ हा उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत कृषी मंत्री महिन्यातून ‘एक दिवस शेतावर’ या उपक्रमात सहभागी होणार आहे. तसेच कृषी सचिव, आयुक्त यांनी पंधरवाड्यातून एकदा तर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या शेतावर उपस्थित राहून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व कृषी उत्पादनासंदर्भात माहिती द्यावी, असे आवाहन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.

  वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार कृषी मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

  कृषी सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी तथा वनामती संचालक रविंद्र ठाकरे, अकोला कृषी विद्यापीठाचे संचालक दिलीप मानकर, सहसंचालक रविंद्र भोसले, सुभाष नागरे, नागपूर कृषी विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.डी.एम.पंचभाई, वनामतीचे अपर संचालक डॉ. अर्चना कडू, सी.पी.टी.पी. संचालक श्रीमती सुवर्णा पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

  कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले, शेतकऱ्यांची केवळ पारंपरिक शेतीवरच भिस्त नसावी तर त्यांचा शेतमाल थेट निर्यातीची क्षमता असणारा असावा. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या थेट बांधावरच जावून त्यांच्या अडी-अडचणी समजावून घेणे गरजेचे आहे. सचिव, कृषी अधिकाऱ्यांप्रमाणे मी देखील ‘कृषी मंत्री’ या नात्याने दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या शेतात भेट देवून पीक नियोजन, उत्पादन क्षमता याबाबत प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न, उत्पादकता आणि उपलब्ध बाजारपेठ या विषयी त्यांना मार्गदर्शन करता येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

  कृषी मंत्र्यांच्या हस्ते यावेळी विभागातील कृषी क्षेत्रात नाविण्यपूर्ण प्रयोगाव्दारे उत्कृष्ट शेती केलेल्या प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. भातशेतीमध्ये मत्स्य पालनासाठी गडचिरोलीचे सर्वश्री गजेंद्र ठाकरे, भात लागवडीसाठी देवानंद दुमाने, सेंद्रीय शेतमाल विक्रीसाठी मंगेश चापले, शेततळ्यात मत्स्य उत्पादनासाठी उत्तम मिस्त्री, जैविक कीडनाशक उत्पादन व सेंद्रीय पध्दतीची फळलागवडीसाठी गोंदियाचे महेंद्र ठाकूर, भंडाराचे संजय एकापुरे यांना सामुहिक शेती व शेतमालाची थेट विक्री यासाठी, काटोल येथील मनोज जवंजाळ यांना उद्यान पंडित तर वर्धेचे कुंदन वाघमारे यांना शेळीपालन व केळी लागवडीसाठी, श्रीमती सुजाता भोयर यांना शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्या बद्दल, चंद्रपूर जिल्ह्यातील पांडुरंग कोकोडे यांना भाजीपाला, हळद लागवड तसेच विक्री, मधुमक्षिका पालन या कार्याकरिता कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून सन्मानित करण्यात आले.

  आदर्श शेतकऱ्यांपासून प्रेरणा घेवून इतर शेतकऱ्यांनी देखील पांरपरिक शेतीसोबतच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रयोगशील शेती करावी. शेतकऱ्यांनी गटशेतीवर भर द्यावा. कमी पर्जन्यमान असलेल्या क्षेत्रामध्ये आंबा, सीताफळ यासारख्या फळझाडांच्या लागवडीवर भर द्यावा, अशा सूचनाही कृषी मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी दिल्यात.

  कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा. तसेच ठिबक क्षेत्रामध्ये वाढ करण्यात यावी. कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न देणारे फळक्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा)च्या कामाला विशेष गती द्या. शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी समजावून घेण्यासाठी त्यांच्यासोबत संवाद वाढवा. शेतकऱ्यांना एका छताखाली कृषी सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा. प्रत्येक तालुका, उपविभागीय तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ‘सन्मान आणि मार्गदर्शन केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीविषयक प्रश्नांबाबत त्यांना मार्गदर्शन करावे.

  यावेळी शेतकऱ्यांशी विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांकडून वैयक्तिक सूचना मागविण्यात आल्यात. काढणी पश्चात सुविधा व तंत्रज्ञान, फळबाग तसेच भाजीपाला लागवडीस वाव, पारंपरिक भातपीक बदलण्याची गरज, वन्यप्राण्यांपासून शेतीला उपद्रव व उपाययोजना यावर यावेळी चर्चा करण्यात आली.

  कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सेंद्रीय शेती, कृषी यांत्रिकीकरण, शेततळे, कृषी उत्पादन प्रक्रिया व विपणन तसेच कृषी धोरणाविषयी माहिती दिली. कृषी विभागातील प्रलंबित योजनांचा यावेळी आढावा घेतला. कृषी विभागाने शेतकऱ्यांशी अधिक संवाद साधून त्यांना पीक नियोजनासाठी मार्गदर्शन करावे. तसेच कृषीविषयक शासनाच्या विविध योजनांची माहितीचा प्रचार आणि प्रसार करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्यात. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, अधीक्षक तसेच शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145