Published On : Mon, Jan 21st, 2019

मोबाईल टॉवरसाठी तातडीने नवे धोरण तयार करा!

Advertisement

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश : धंतोली झोनच्या जनसंवाद कार्यक्रमात दिले समस्या सोडविण्याचे आश्वासन

नागपूर : घरांवर आणि अन्य इमारतींवर लागलेल्या मोबाईल टॉवरचा अनेक नागरिकांना त्रास होतो आहे. यासंदर्भात तातडीने नवे धोरण तयार करण्यात यावे. तोपर्यंत त्या टॉवरला पुरविण्यात येणारी वीज बंद करण्यात यावी. सहायक आयुक्तांचे पत्र प्राप्त झाल्याशिवाय वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा पूर्ववत करू नये, असे निर्देश नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे झोननिहाय जनसंवाद कार्यक्रम घेत आहेत. याअंतर्गत सोमवारी (ता. २१) धंतोली झोन येथे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, नगरसेवक विजय चुटेले, प्रमोद चिखले, भगवान मेंढे, नगरसेविका वंदना भगत, लता काडगाये, हर्षला साबळे, भारती बुंदे, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे यांची उपस्थिती होती.

धंतोली झोनअंतर्गत असलेल्या टॉवरसंदर्भात नागरिकांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोबाईल टॉवरसंदर्भात धोरण ठरविण्याचे निर्देश दिले. जनसंवाद कार्यक्रमापूर्वी एकूण ४० आणि कार्यक्रमादरम्यान २० असे एकूण ६० अर्ज प्राप्त झाले होते. चिचभवन येथील क्राऊन सोसायटीमध्ये एकूण १४ प्लॉटमधून नासुप्रने चुकीचा रस्ता टाकल्याची बाब तेथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली.

८० हजार रुपये भरून मोजणी केली. सुमारे अडीच कोटी रुपये विकास शुल्क भरले. असे असतानाही नासुप्र विकासकामे करीत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. यासंदर्भात भूमापन अधिकारी, नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बैठक घेऊन तातडीने ही समस्या सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. बाभूळखेडा, पार्वतीनगर, जयभीम चौक येथील स्वच्छतेसंदर्भातीलही तक्रारी नागरिकांनी केल्या. या सर्व समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

गांधीसागर तलावातील कचरा नियमित काढण्यात यावा आणि लगतचे अतिक्रमणही काढण्यात यावे, यासंदर्भातील एक अर्ज जनसंवाद कार्यक्रमात होता. यावर गांधीसागरच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव शासनाकडे असल्याची माहिती धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे यांनी दिली. लोककर्म विभागाशी संबंधित १३ तक्रारी होत्या. या सर्व तक्रारींपैकी आवश्यक तक्रारींची मौका चौकशी करून तक्रारकर्त्यांना न्याय देण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दूषित पाण्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत त्या तातडीने सोडविण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.

धंतोली झोनअंतर्गत आलेल्या तक्रारींचा आधार घेत जी लहान मोठी बांधकामाची कामे आहेत व अन्य कामांचा प्रस्ताव नगरसेवकांच्या सहकार्याने अधिकाऱ्यांनी तातडीने तयार करावा. आठ ते दहा कोटींची तरतूद या कामांसाठी करण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. सन २०११ पूर्वीच्या अतिक्रमण धारकांना शासन मालकी हक्काचे पट्टे वाटप करीत आहेत. सर्वांसाठी आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाखांचा विमा काढल्या जात आहे.

सर्वांसाठी अन्न याअंतर्गत आता केसरी कार्डाधारकांनाही धान्य मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोलर गीझरही आता ८० टक्के सबसिडीने देत असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. धंतोली झोनच्या जनसंवाद कार्यक्रमात तुलनेने तक्रारी कमी आल्यात. यासाठी त्यांनी सहायक आयुक्त स्मिता काळे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला धंतोली झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभागातील नागरिक उपस्थित होते.