Published On : Mon, Apr 12th, 2021

कोव्हिड प्रतिबंधक लस हेच ‘ब्रम्हास्त्र’

‘कोव्हिड संवाद’ कार्यक्रमात डॉक्टरांचा सल्ला : मनपा-आय.एम.ए.तर्फे ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद

नागपूर : शहरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी नागपूरसह राज्यात कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. तसेच नागपूर महनगरपालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतू कोरोना संसर्गापासून स्वत:ला आणि आपल्या परिवाराला वाचविण्यासाठी कोव्हिड प्रतिबंधक लस हेच ब्रम्हास्त्र आहे, असे प्रतिपादन बालरोग तज्ञ डॉ. गिरीश चरडे आणि मानसोपचार तज्ञ डॉ. श्रेयश मगिया यांनी केले.

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते. आजचा विषय ‘कोव्हिड मधील मानसिक स्थिती, कोव्हिड आणि बालकांवरील उपचार’ असा होता. या विषयावर संवाद साधतानाच त्यांनी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही दिली.

डॉ. गिरीश चरडे म्हणाले, मागिल वर्षी कोरोनाच्या लाटेत लहान बालकांना कोरोनाचा संसर्ग फार कमी होता. मात्र यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नवीन युरोपियन स्ट्रेन कोरोना अधिक झपाट्याने पसरत आहे. तसेच हा व्हायरस अधिक धोकादायक आहे. त्यामुळे लहान बालकांची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या १८ वर्षाखालील मुलांवर लसीचे परीक्षण सुरू आहे. त्यामुळे अद्याप १८ वर्षाखालील मुलांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात नाही आहे, असेही ते म्हणाले.

लहान मुलांना सर्दी-खोकला झाल्यास घरातील ज्येष्ठांपासून त्यांना दूर ठेवावे. अशा वेळेस लहान मुले सुपर स्प्रेडर बनू शकतात. तसेच घरातील मोठ्यां व्यक्तींनी नियमांचे पालन केल्यास बालके अनुकरण करतात. त्यामुळे बालकांसमोर मास्क घालणे, स्वच्छतेच्या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या कृती त्यांच्यासमोर करण्याचे आवाहन डॉ. गिरीश चरडे यांनी केले. कोरोना प्रतिबंधक लस पुर्णपणे सुरक्षित आहे. ४५ वर्षावरील प्रत्येकाने घ्यावी तसेच इतर लोकांना लस घेण्यास प्रवृत्त करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


मानसोपचार तज्ञ डॉ. श्रेयश मगिया म्हणाले, गेल्या एक वर्षात कोरोनाचा अनेक रुग्णांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक रुग्ण डिप्रेशनमध्ये सुध्दा गेलेले आहेत. मात्र यासाठी पूर्णपणे सोशल मिडिया कारणीभूत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

गृहविलगिकरणात असलेल्या बाधितांनी कोरोना नियमावलीचे पालन करीत घरातील इतर सदस्यांशी व्यवहार करावा. नेहमी आनंदी रहावे, पुर्ण झोप घ्यावी, मनात नकारात्मक विचार आणू नयेत तसेच या काळात सोशल मिडियाचा उपयोग न करता चांगली पुस्तके वाचल्यास मन प्रफुल्लीत राहिल आणि मनात सकारात्मक विचार येतील असेही ते म्हणाले.

सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना त्रिसूत्रीचे पालन करा, प्रशासनाने जारी केलेल्या दिशानिर्देशांचे पालन करा तसेच ४५ वर्षावरील प्रत्येकाने लस टोचून स्वत:ला व कुटुंबाला सुरक्षित करा असे आवाहन यावेळी बालरोग तज्ञ डॉ. गिरीश चरडे आणि मानसोपचार तज्ञ डॉ. श्रेयश मगिया यांनी केले.