Published On : Fri, Jun 4th, 2021

कोरोनाच्या संकटात ‘कोव्हिड संवाद’ ठरले नागपूरकरांसाठी मार्गदर्शक : महापौर दयाशंकर तिवारी

मनपा व आयएमए चा संयुक्त उपक्रम कोव्हिड संवादचा समारोप : वंदेमातरम जन आरोग्य केन्द्रासाठी आय.एम.ए. करणार सहकार्य

नागपूर: कोरोनाचे संकट नवीन असताना सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पहिली लाट ओसरल्यानंतर दुस-या लाटेमध्ये कोव्हिडचा धोका आणखी वाढला. अशा स्थितीमध्ये लोकांच्या मनातील भीती घालवून त्यांना असलेले संभ्रम, त्यांचे प्रश्न, शंका यांना योग्य उत्तरे देउन त्यांच्या मनातील भीती, संभ्रम दूर करण्याचे काम कोव्हिडच्या दोन्ही लाटेमध्ये ‘कोव्हिड संवाद’ने केले आहे. तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे करण्यात आलेले मार्गदर्शन हे या संकटाच्या स्थितीत नागपूरकरांसाठी मार्गदर्शक ठरले आहे, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

Advertisement

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोशिएशन (आय.एम.ए.)च्या विद्यमाने मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘कोव्हिड संवाद’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचा शुक्रवारी (ता.४) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. याप्रसंगी स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, आयएमए चे विद्यमान अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, सचिव डॉ. सचिन गाठे, माजी अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी, आयएमए च्या सदस्या डॉ. मनीषा राठी, डॉ. मंजुषा गिरी, डॉ. सचिन जहागीरदार आदी उपस्थित होते.

कोव्हिडच्या दुस-या लाटेमध्ये शहरात एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना नागरिकांच्या मनात भीतीही वाढत होती. अशा स्थितीत त्यांना मानसिक आधार आणि योग्य मार्गदर्शनाची गरज ओळखून २४ मार्च २०२१ पासून मनपामध्ये फेसबुक लाईव्हद्वारे ‘कोव्हिड संवाद’ सुरू करण्यात आले. या तीन महिन्याच्या काळामध्ये आयएमएच्या पुढाकाराने विविध क्षेत्रातील ६७ तज्ज्ञ डॉक्टरांनी कोव्हिडबाबत प्राथमिक माहिती, कोव्हिडमध्ये गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी, मानसिक समस्या व निराकरण, कोव्हिडनंतर उद्भवणारा ब्लॅक फंगस आजार आणि घ्यावयाची काळजी, कोव्हिड काळात येणारे नैराश्य आणि त्यावर मात, भूलतज्ज्ञ व कोव्हिड शस्त्रक्रियांची त्रासदी, बालक आणि वयस्क व्यक्तींना होणारा कोव्हिड आणि संसर्गजन्य आजार, स्त्रियांचे आजार अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले व नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. या तीन महिन्यात एका फेसबुक लाईव्हद्वारे मनपा ५० हजार नागरिकांपर्यंत पोहोचू शकली. याशिवाय संपूर्ण कोव्हिड संवादमध्ये सुमारे ५० लाख लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मार्गदर्शन करता आले. नागरिकांच्या मनातील भीती घालवून त्यांच्या शंकांचे निरसन करणे हा या कार्यक्रमा मागील उद्देश सफल करण्यात आयएमएच्या सहकार्याने यश मिळाले, असे महापौर दयाशंकर तिवारी यावेळी म्हणाले. महापौर म्हणाले की आय.एम.ए.च्या माध्यमाने १५० डॉक्टरांनी कोव्हिड बाधित रुग्णांशी संपर्क करुन त्यांना योग्य सल्ला दिला. तसेच काळी बुरशीचा आजारात जनजागरण करण्यामध्ये त्यांचे सहकार्य मिळत आहे. मनपा तर्फे ५ पोस्ट कोव्हिड केयर सेंटर यासाठी सुरु करण्यात आले आहे.

७५व्या स्वातंत्र्य वर्षानिमित्त शहरात ७५ वंदे मातरम् हेल्थ पोस्ट तयार करण्याची संकल्पना असून यामुळे नागपूर शहरातील आरोग्य सुविधा नसलेल्या भागात मोठी सुविधा निर्माण होणार आहे. भौतिक सुविधांची व्यवस्था करून स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हे हेल्थपोस्ट चालविले जाणार आहेत. मनपाला सदैव सहकार्य करणा-या आयएमए ने या कार्यामध्येही आपले सहकार्य दर्शविण्याची विनंती यावेळी महापौरांनी केली. ७५ हेल्थपोस्ट पैकी किमान १० हेल्थपोस्टची जबाबदारी आयएमए ने स्वीकारून शहरातील मोठ्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पोहोचावी, अशीही सूचना महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली. आयएमए चे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे यांनी महापौरांच्या या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत शहरासाठी ही अत्यंत महत्वपूर्ण योजना असून आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधा नागरिकांना मिळाव्यात यासाठी आयएमए सदैव मनपा सोबत आहे. १० हेल्थपोस्टची जबाबदारी स्वीकारण्याबाबत आयएमए सकारात्मक असून याबाबत शहरातील मोठ्या मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलशी संवाद साधण्यात येईल, असा विश्वास आयएमए मार्फत त्यांनी दिला.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी व स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी आयएमए च्या सर्व पदाधिका-यांचे तुळशीरोप व आभारपत्र देउन मनपाच्या वतीने आभार मानले. आयएमए तर्फे सुद्धा महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह संपूर्ण चमूचे अभिनंदन करून आभार मानले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement