Published On : Wed, Sep 15th, 2021

पोलिस कर्मचा-यांच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी मनपाची विशेष मोहिम

दहाही झोनमधील ५०० पोलिस कर्मचा-यांची चाचणी

नागपुर: पुणे येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेउन परतलेले १२ पोलिस कर्मचारी कोव्हिड पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट होताच मनपाद्वारे पोलिस कर्मचा-यांच्या चाचणीसाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार दहाही झोनअंतर्गत येणा-या सर्वच पोलिस स्टेशनमध्ये जाउन मनपाची आरोग्य चमू पोलिस कर्मचा-यांची आरटीपीसीआर चाचणी करीत आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत ५०० पोलिस कर्मचा-यांची कोव्हिड चाचणी करण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्तांनी तात्काळ आदेश देत मनपाच्या चमूला पोलिसांच्या चाचणीसंदर्भात निर्देशित केले. त्यानुसार मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्या मार्गदर्शनात मंगळवारपासून पोलिस कर्मचा-यांची चाचणी करण्यात येत आहे. मंगळवार ते शनिवार असे पाच दिवस आरटीपीसीआर चाचणीची ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मंगळवारी व बुधवारी (१४ व १५ सप्टेंबर) पारडी, कळमना, अंबाझरी, सीताबर्डी, गिट्टीखदान, इमामवाडा, प्रतापनगर, नंदनवन, शांतीनगर, लकडगंज, यशोधरा नगर आदी पोलिस स्टेशनमध्ये जाउन मनपाच्या आरोग्य चमूद्वारे पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली.

पोलिस कर्मचा-यांच्या चाचणीकरिता वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांच्या नेतृत्वात अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, डॉ.शुभम मनगटे, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.कांबळे, डॉ. भावना सोनकुसळे, डॉ.पांडे, डॉ. जैतवार, डॉ. प्रीति, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ.माने, डॉ. भिवगडे, डॉ. अतिक, डॉ. भोयर आदी आपापल्या चमूंसह परिश्रम घेत आहेत.