Published On : Wed, Sep 15th, 2021

ध्येय निश्चितीसह प्रयत्नातील सातत्य यशाचे गमक : महापौर दयाशंकर तिवारी

आंतरराष्ट्रीय बॉक्सर अल्फिया पठाणला ‘आउटस्टँडिंग यंग पर्सन’ पुरस्कार प्रदान

नागपुर: परिश्रम करू इच्छिणा-यांसाठी काहीही अशक्य नाही. ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने परिश्रम करण्याची तयारी असेल तर एक दिवस यश नक्कीच मिळते. मिळालेले यश कायम ठेवण्यासाठी सुद्धा परिश्रमातील सातत्य आवश्यक आहे. सातत्यपूर्ण परिश्रमातूनच अल्फिया पठाण या तरुणीने नवा आदर्श निर्माण केला आहे, अशा शब्दांत महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपूरकर आंतरराष्ट्रीय बॉक्सर अल्फिया पठाणचा गौरव केला.

नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने जेसीआय नागपूर रॉयल या संस्थेद्वारे बुधवारी (ता.१५) अल्फिया पठाणला ‘आउटस्टँडिंग यंग पर्सन’ हा पुरस्कार महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महापौर बोलत होते. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये झालेल्या छोटेखानी समारंभात ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, जेसीआय नागपूर रॉयलचे अध्यक्ष निरव रेगे, सचिव सलोनी दुबे, संस्थापक अध्यक्ष राजेश दुबे, जेसीआय चे जावेद राणा, स्वाती सारडा, आजेश चावला, जेसीआय वीक संयोजक चेतन रंदिये आणि मनीष जायस्वाल, अल्फियाचे वडील अक्रम पठाण आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर म्हणाले, नागपूर बॉक्सिंग असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने शहरातील मुष्टीयोद्ध्यांशी संपर्क येतो. अल्फियाशी पहिल्यांदा भेट झाली तेव्हा पदक जिंकण्यासाठी असणारी जिद्द आणि त्यासाठी आवश्यक क्षमता अशीच तिची ओळख होती. आज यशाच्या एका टप्प्यावर असूनही ती ओळख तसूभरही तिने कमी होउ दिली नाही, ही अभिमानाची बाब आहे.

थोड्याशा यशानेही अनेकांना हवेत उडल्याचा भास होतो मात्र यशाचे एकेक मजले गाठत असतानाही पाय अगदी जमिनीवर घट्ट रोवून बसणे हा अल्फियाचा गुण इतर खेळाडूंसाठी प्रेरणा ठरणारा आहे, असेही महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.
दहावीची परीक्षा आणि स्पोर्ट्स कॅम्पमध्ये निवड अशा दोन्ही गोष्टी एकत्रच आल्या असताना खेळाला प्राधान्य देत त्यादृष्टीने मेहनत घेतल्याचा प्रसंग सांगताना अल्फियाच्या खेळाप्रति असलेल्या जिद्द आणि चिकाटीचे महापौरांनी कौतुक केले.