Published On : Tue, Feb 16th, 2021

गर्दी करणाऱ्या समारंभावर मनपाचा कारवाईचा बडगा

मनपाच्या उपद्रव शोध पथकाची कामगिरी : एकाच दिवशी सात सभागृहावर कारवाई

नागपूर : नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. १६) शहरातील सात सभागृहावर कारवाई केली आहे. प्रशासनाने लग्न समारंभासाठी जारी केलेल्या नियमावलीचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने मनपाद्वारे ही कारवाई करण्यात आली. शहरातील विविध झोन अंतर्गत सात सभागृहावरील कारवाईत ३७ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Advertisement

मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर झोन शोध पथक प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोन शोध पथक प्रमुख धर्मराज कटरे, नेहरूनगर झोन शोध पथक प्रमुख नथ्थु खांडेकर व सतरंजीपूरा झोन शोध पथक प्रमुख प्रेमदास तरवटकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

यामध्ये लक्ष्मीनगर झोन मधील पराते सभागृह, राधे मंगलम सभागृह, गोल्डन लिफ लॉन, साईबाबा सभागृह, धरमपेठ झोन मधील कुसुमताई वानखेडे सभागृह, नेहरूनगर झोन मधील जतकेवार मंगल कार्यालय तसेच सतरंजीपूरा मधील प्रितम सभागृहाचा समावेश आहे. या सभागृहावर मनपा प्रशासनाने लग्न समारंभासाठी जारी केलेल्या निर्धारित संख्येपेक्षा जास्त वऱ्हाडी आढळल्यामुळे त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये तर मातृ मंगल कार्यालयात सॅनिटायझर ठेवले नसल्यामुळे त्यांच्याकडून दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये मागील आठवडयात वाढ झालेली आहे. नागरिकांनी कोव्हिड संसर्गाचा धोका टळलेला नाही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरत आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर, सोशल डिस्टन्स राखणे, नियमित हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. कोव्हिड रुग्णांच्या वाढत्या संख्येला या बाबींकडे झालेले दुर्लक्ष कारणीभूत आहे. शहरात खामला, स्वावलंबीनगर, जयताळा, अयोध्या नगर, न्यू बिडिपेठ, वाठोडा, दिघोरी, जरीपटका, जाफरनगर आदी भागांमध्ये कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेत सतर्क राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी कुठलीही लक्षणे येण्याची वाट न पाहता आपल्या जवळच्या कोव्हिड चाचणी केंद्रात जाऊन मोफत चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मनपा तर्फे सतत करण्यात येत आहे.

मागील काही दिवसात शहरात सर्वत्र हलगर्जीपणा दिसून येत आहे. बाजारात होणारी गर्दी, मास्क लावणे, दुकानापुढे सॅनिटाजर ठेवून त्याचा वापर करूनच ग्राहकांना प्रवेश देणे आदींबाबत दुर्लक्षितता दिसून येत आहे. यासंदर्भात मनपाने कठोर पाउल उचलत मनपाचे उपद्रव शोध पथ आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने विशेष मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे अशाप्रकारचे दुर्लक्ष करणा-यांवर ‘ऑन द स्पॉट’ कारवाई केली जात आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement