Published On : Tue, Feb 16th, 2021

२०२२ च्या निवडणुकीतही बहुमताने सत्तेत येऊ!

सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांचा विश्वास


नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या झोन सभापती निवडणुकीमध्ये १० पैकी ९ झोनमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झालेला आहे. विशेष म्हणजे या नऊ झोन सभापतींमध्ये आठ महिलांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाने दिलेली जबाबदारी पक्षाचे सर्व नवनिर्वाचित झोन सभापती जनतेच्या कार्याला गती देउन सार्थ ठरवितील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात पक्षाचे सर्व नवनिर्वाचित झोन सभापती उत्तम कार्य करतील. येणा-या २०२२च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत येईल, असा विश्वास मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी व्यक्त केला.

नागपूर महानगरपालिकेच्या झोन सभापती निवडणुकीनंतर सत्तापक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत संदीप जाधव बोलत होते. यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, परिवहन समिती सभापती तथा सत्तापक्ष उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, प्रतोद दिव्या धुरडे, उपनेत्या वर्षा ठाकरे, नवनिर्वाचित झोन सभापती पल्लवी श्यामकुळे, सुनील हिरणवार, कल्पना कुंभलकर, वंदना भगत, स्नेहल बिहारे, श्रद्धा पाठक, अभिरूची राजगिरे, मनीषा अतकरे, प्रमिला मथरानी, नगरसेविका सोनाली कडू, भाग्यश्री कानतोडे, सुषमा चौधरी आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना सत्तापक्ष नेते म्हणाले, मनपामध्ये शतप्रतिशत सत्ता आणू असा दावा करणा-या काँग्रेसने लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज या आठपैकी एकाही झोनमध्ये आपले उमेदवार दिले नाही. उलट आसीनगर झोनमध्ये बसपाच्या एका उमेदवाराला समर्थन देऊन बसपामध्येच खिंडार पाडण्याचे षडयंत्र त्यांनी रचले. स्वत:च्या पक्षाचा उमेदवार निवडून आणावा, हे सोडून खालच्या पातळीचे राजकारण करीत आहे. मंगळवारी झोनमध्ये उमेदवार उभा करून ऐनवेळी अर्ज मागे घेतला. एकीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नागपूर महानगरपालिकेमध्ये शतप्रतिशत सत्ता आणू असा दावा करतात. मात्र दुसरीकडे असे फोडाफोडीचे राजकारण करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

भारतीय जनता पक्षाने मित्रपक्ष असलेला बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या वंदना भगत यांनाही धंतोली झोनच्या सभापतीपदाची जबाबदारी देत सर्वसमावेशकता सिद्ध केली आहे. एकूणच झोनमधील प्रलंबित विकास कामे सुरू करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजपचे सर्व नवनिर्वाचित झोन सभापती त्यांच्या झोनमधील नगरसेवकांना विश्वासात घेउन तसेच प्रशासनाशी योग्य समन्वय साधून कार्य करतील, असा विश्वासही सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी व्यक्त केला.