Published On : Tue, Oct 27th, 2020

मनपाचे शिक्षक देत आहे ऑनलाईन शिक्षण शिक्षकांच्या कार्याची विस्तृत माहिती दोन दिवसात सादर करा !

Advertisement

शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांचे निर्देश

नागपूर : कोव्हिडच्या संकटाच्या काळात नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षकांमार्फत कुठे सेवा देण्यात आली, किती शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण दिले, किती शिक्षक विद्यार्थ्यांना घरी जाउन शिकवत आहेत, किती शिक्षक ऑनलाईन शिक्षणासह कोव्हिडसंदर्भातील कार्य करीत आहेत आदी संपूर्ण विषयांसंदर्भात विस्तृत माहिती येत्या दोन दिवसात शिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करा, असे निर्देश शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी दिले.

विविध विषयांच्या अनुषंगाने मंगळवारी (ता.२७) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात शिक्षण विशेष समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, सदस्या प्रणिता शहाणे, हर्षला साबळे, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, सहायक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संजय दिघोरे, सहायक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेंद्र सुके, दहाही झोनचे शाळा निरीक्षक उपस्थित होते. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर व इतर अधिकारी जुळले होते.

बैठकीत शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यासक्रम कोणत्या पद्धतीने राबविण्यात आल्यासंदर्भात दहाही झोनच्या शाळा निरीक्षकांकडून आढावा घेतला. कोव्हिडच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांसह शिक्षकांनीही उत्तम कार्य बजावले आहे. अनेक शिक्षकांनी कोव्हिड संदर्भात सेवा दिली. अशात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होउ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्याक्रम शिकविण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक साधने नसल्याने काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरी जाउन शिकविण्याचा पुढाकार घेतला ही कौतुकास्पद बाब आहे. असे कोव्हिड काळात प्रत्येक शिक्षकाने केलेले कार्य पुढे यावे साठी त्यांच्या कार्याची विस्तृत माहिती संबंधीत शाळा निरीक्षकांनी सादर करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

सर्व शाळांच्या दुरूस्तीसाठी एकच निविदा
नागपूर महानगरपालिकेच्या शाळांची दुरूस्ती करण्यासंदर्भात प्रत्येक झोनचे वेगळी निविदा न काढता सर्व शाळांकरिता एकच निविदा काढण्याचा ठराव बैठकीत मंजुर करण्यात आला. मनपाच्या सर्व शाळांच्या अत्यावश्यक कार्याची माहिती मागवून त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून शाळा दुरूस्त करण्यात याव्यात, असे यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे म्हणाले.

नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नागपूर महानगरपालिकेला ८ सीबीएसई शाळा मंजुर करुन देण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. त्यांच्या या पुढाकाराबद्दल समितीतर्फे ना. गडकरींचे अभिनंदन करण्यात आले. याशिवाय मनपा विद्यार्थ्यांना टॅब देणे तसेच प्रत्येक मतदार संघात एक अशा एकूण ६ इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात अर्थसंकल्पात विशेष निधीची व्यवस्था करण्यात आल्याबद्दल स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांचेही अभिनंदन करण्यात आले.