Published On : Thu, Jul 23rd, 2020

कोव्हिड-१९ च्या नियमांचे उल्लंघन करणा-या ६०८० जणांवर मनपाची कारवाई

Advertisement

सावधान! आपल्यावर उपद्रव शोध पथकाची नजर आहे : २८ लाखांवर दंड वसूल

नागपूर, : शहरात कोव्हिड-१९चा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य शासनातर्फे जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार नागपूर महानगरपालिकेतर्फे केले जात आहे. या आवाहनाला नागपूरकर जनतेतर्फे सकारात्मक प्रतिसाद ही मिळत आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिक नियमांचे उल्लंघन करुन स्वत: सह इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. नियमांचे उल्लंघन करून कोव्हिडच्या धोक्याला आमंत्रण देणा-या अश्या तब्बल ६०८० नागरिकांवर मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कारवाई करण्यात आली आहे. मास्क न लावणे, बाजारामध्ये सम व विषम तारखांच्या नियमांचे पालन न करणे अशा बाबींमध्ये कारवाई करून मनपाने ५ जून ते २१ जुलै २०२० या दरम्यान ६०८० जणांकडून २८ लाख ९० हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मिशन बिगीन’ अंतर्गत संपूर्ण नागपूर शहरात लॉकडाउनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाजारांमध्ये गर्दी होउ नये यासाठी दुकानांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये सम व विषम तारखांनुसारच दुकाने सुरू करण्याची तरतूद आहे. तसेच घराबाहेर कुठेही फिरताना मास्क लावणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्याचे निर्देश मनपातर्फे देण्यात आले आहेत. शहरातील बाजारांमध्ये या नियमांचे पालन केले जावे यासाठी महापौर संदीप जोशी व आयुक्त तुकाराम मुंढे स्वत: शहरातील विविध भागात फिरून जनजागृतीही करीत आहेत. मात्र मनपाच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून बेजाबदारपणे वागणूक करणा-यां विरोधात मनपा प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रत्येक झोननिहाय धडक कारवाई केली जात आहे. नागरिकांकडून दंड वसूल करणे हा कारवाईचा उद्देश नसून कोरोनाच्या या संकटात शहरवासीयांनी संसर्गापासून स्वत:सह इतरांचाही बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत शिस्त लावणे यादृष्टीने उपद्रव शोध पथक कारवाई करीत आहे.

घराबाहेर कुठेही सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क लावणे बंधनकारक असून नियम न पाळणा-यांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. ५ जून २०२० पासून ही कारवाई सुरू करण्यात आली असून २१ जुलै २०२० पर्यंत मास्क लावणा-या ४६०१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई करण्यात आलेल्यांकडून २०० रुपये दंड याप्रमाणे ९ लाख २० हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.

बाजारांमध्ये सम व विषम तारखांच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर सुरूवातीला १ हजार रुपये दंड ठोठावण्याचे आदेश होते. त्यानुसार ५ जून ते १८ जुलै २०२० दरम्यान १३८० दुकानांवर कारवाई करून १ हजार रुपये या प्रमाणे एकूण १३ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सम व विषम तारखांच्या नियमांचे उल्लंघन करण्यासंदर्भात १७ जुलै २०२० रोजी मनपाद्वारे नवीन आदेश काढण्यात आले. या आदेशानुसार सम व विषम तारखांच्या नियमांचे पहिल्यांदा उल्लंघन केल्यास ५ हजार रुपये, दुस-यांदा ८ हजार रुपये व तिस-यांदा उल्लंघन केल्यास १० हजार रुपये दंड वसूल करण्याचे निर्देशित करण्यात आले. त्यानुसार १८ जुलैपासून नवीन नियमानुसार कारवाई करण्यात आली. १८ ते २१ जुलै दरम्यान ८० दुकानांवर पहिल्यांदा नियमभंगाची कारवाई करून ५ हजार रुपये या प्रमाणे एकूण ४ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तर तिस-यांदा नियम तोडणा-या १९ दुकानांवर कारवाई करीत १० हजार रुपये याप्रमाणे एकूण १ लाख ९० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सम व विषम तारखांसंदर्भात जुन्या नियमानुसार १३८० (१३ लाख ८० हजार रुपये दंड) व नवीन नियमानुसार एकूण ९९ जणांवर (५ लाख ९० हजार रुपये दंड) कारवाई करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत एकूण १९ लाख ७० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मंगळवारी १५४ जणांवर कारवाई
मंगळवारी (ता.२१) महापौर व आयुक्तांनी जनजागृती दौ-यामध्ये नियमांचे उल्लंघन करणा-यांवर ‘ऑन द स्पॉट’ कारवाई केली. शहरातील सर्व झोनमध्ये झालेल्या या कारवाईत मास्क न वापरणारे आणि सम व विषम तारखांच्या नियमांचे उल्लंघन करणारे अशा १५४ जणांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एकूण ३ लाख २ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

मास्क न वापरणा-या १११ जणांवर कारवाई करीत २०० रूपये याप्रमाणे २२ हजार २०० रुपये दंड ठोठावण्यात आला. सम व विषम तारखांच्या नियमांचे पालन न करणा-या ४३ दुकानदारांवरही कारवाई करण्यात आली. पहिल्यांदाच नियम तोडणा-या ३० दुकानदारांवर कारवाई करीत ५००० रूपये याप्रमाणे १ लाख ५० हजार रुपये तर तिस-यांदा नियम तोडणा-या १३ दुकानांवर कारवाईद्वारे १० हजार रुपये याप्रमाणे १ लाख ३० हजार रुपये असा एकूण २ लाख ८० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.