Published On : Tue, Apr 24th, 2018

कॉर्पोरेट सेक्टरने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याची गरज – नितीन गडकरी

Advertisement


मुंबई : कॉर्पोरेट सेक्टरने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याची गरज असून अशी गुंतवणूक वाढल्यास समाजातील सर्वसामान्य माणसाला त्याच्या गावात आरोग्य सेवा आणि सुविधांची उपलब्धता होऊ शकेल असे मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले

आज कॉलेज ऑफ फिजिशिएन ॲण्ड सर्जनस् मुंबई च्या १४३ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे, वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय देशमुख, सीपीएसचे अध्यक्ष डॉ गिरीश मेंदरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री. गडकरी म्हणाले, वैद्यकीय शिक्षण सार्वत्रिक होण्याची जेवढी गरज आहे तेवढीच त्याची गुणवत्ता जपण्याची देखील गरज आहे, त्यात तडजोड होता कामा नये. जीवनात पैसा महत्वाचा आहेच परंतु ते साधन होऊ शकते अंतिम साध्य नाही, त्यामुळे ज्या समाजाने आपल्याला मोठे केले त्या समाजाचे ऋण फेडण्याची, सामाजिक संवेदनशीलता जपण्याची संधी डॉक्टरांना मिळत असते त्याची जपणूक त्यांच्याकडून व्हावी.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण हे देशाच्या भविष्यासाठी महत्वाचे असल्याचे सांगून श्री. गडकरी म्हणाले, शिक्षणातून केवळ रोजगार मिळत नाही तर नागरिकाचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण होते. यातूनच आदर्श समाजाकडे त्याची वाटचाल सुरु होते. नीट सारख्या परीक्षांमुळे वैद्यकीय शिक्षण गुंणवत्तापूर्ण होण्यास मदत झाली आहे. केंद्र सरकारने १० कोटी परिवारांना वैद्यकीय विम्याच्या छत्राखाली आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय धेतला आहे. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या ११५ जिल्ह्याची निवड केंद्र सरकारने केली असून त्या जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास करण्याचे ठरवले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील जिल्हा रुग्णालये टाटा ट्रस्ट सारख्या नामांकित चॅरिटबेल ट्रस्टना काही कालावधीसाठी चालवण्यासाठी देता येतील का, याचा अभ्यास अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी करावा, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

ज्ञानाचा फायदा रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी करा- सुधीर मुनगंटीवार
पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या डॉक्टरांनी आपल्या ज्ञानाचा फायदा रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी करावा असे आवाहन करून अर्थमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सीपीएस मधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. आपल्या ज्ञानातून समाज सेवेचा नॅशनल हायवे बांधण्याचे आवाहन करून ते म्हणाले की, डॉक्टर होणं हे खरच जबाबदारीचे काम आहे. इतर सर्व गोष्टी या मानवनिर्मित असतात त्यामुळे त्यांची दुरुस्ती करणे शक्य होते. परंतु देवाने निर्माण केलेल्या मनुष्याला रोगमुक्त ठेवण्याचे काम डॉक्टर करतात त्यामुळे त्यांना देवदूत म्हटले जाते, देवाचा अंश मानले जाते. ग्रामीण भागात सीपीएसमधून पदव्युत्तर शिक्षण घेऊन काम करणाऱ्या डॉक्टरांचे योगदान मोठे आहे असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, एमबीबीएसनंतर उच्च शिक्षण घेण्याची संधी सीपीएसने दिली. राज्य आणि देशातील आरोग्य सेवा योग्यपद्धतीने हाताळली तर मेडिकल टुरिझमची मोठी शक्ती भारतात आणि महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील विविध शाखानिहाय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पदव्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये२०० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश होता. कार्यक्रमामध्ये वैद्यकीय शिक्षण सचिवांसह संबंधित मान्यवरांची यथोचित भाषणे झाली.

Advertisement
Advertisement
Advertisement