Published On : Thu, Mar 12th, 2020

विदर्भातील कलावंत मुलांनी सोशल मिडियाचा वापर करावा, अजित पारसे, ‘विदर्भ टॅलेंट आयकॉन’

नागपूर: विदर्भात गायन, नृत्यासह विविध कलेत निपुण कलावंतांची खाण आहे. परंतु विदर्भाबाहेरील प्रतिभावंत मुलांप्रमाणे सोशल मिडियाच्या वापरात येथील मुले कमी पडत आहे. त्यामुळे येथील प्रतिभावंत मुलांनी सोशल मिडिया वापराचा जास्तीत जास्त वापर करावा, असे मत सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी व्यक्त केले.

सिव्हिल लाईन येथील वसंतराव देशपांडे सभागृहात बुधवारी ‘मिस ऍन्ड मिसेस विदर्भ टॅलेंट आयकॉन 2020’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संजय रघटाटे, नगरसेवक अविनाश ठाकरे, बालरंगभूमीच्या अध्यक्षा मधुरा गडकरी, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार, प्रज्ज्वल भोयर आदी उपस्थित होते.

पारसे पुढे म्हणाले, विदर्भातील मुलांमध्ये प्रतिभा आहे, कौशल्य आहे, सादरीकरण आहे, पण ही मुले कुठे कमी पडतात? विदर्भातील प्रतिभावंत मुले आणि विदर्भाबाहेरील प्रतिभावंतांमध्ये काय फरक आहे? याचा शोध घेतला तर एक बाब प्रकर्षाने पुढे येते.

सोशल मिडियाच्या वापरामध्ये विदर्भातील प्रतिभावंत मुले कमी पडत आहे. सोशल मिडियाबाबत जास्त बोलण्याची गरज नाही. कुठल्या ना कुठल्या स्तरावर सर्वच जण सोशल मिडियाचा वापर करतात. सोशल मिडिया विचाराचे आदानप्रदान करणारे व्यासपीठ नक्कीच आहे.


मात्र, फेसबुक, व्हॉटस्‌अप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मिडियाचा व्यावसायिक वापरही करणे गरजेचे आहे. विदर्भातील कलागुणांना वाव देण्यासाठी केवळ फेसबुकवर पोस्ट टाकून काहीही होणार नाही. सोशल मिडियाचा व्यावसायिक वापराची सवय विदर्भातील प्रतिभावंत मुलांना लावण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

प्रज्ज्वल भोयर यांनी सुरू केलेला हा कार्यक्रम केवळ इव्हेंटपुरता मर्यादित राहू नये, येथील प्रतिभावंतांसाठी ही एक चळवळ ठरावी, अशी अपेक्षाही पारसे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन प्रज्ज्वल भोयर यांनी केले.