Published On : Thu, Mar 26th, 2020

CoronaVirus in Nagpur : गरजूंच्या मदतीसाठी वकिलांकडून १४ लाख गोळा

Advertisement

नागपूर : कोरोनाला नष्ट करण्यासाठी देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीसाठी समाजातील सक्षम घटकांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. वकिलांच्या संघटनांनी त्यांना प्रतिसाद देत गुरुवारी एकाच दिवशी १४ लाख रुपयावर रक्कम गोळा केली. दानाचा ओघ सुरूच असल्यामुळे हा आकडा २० लाख रुपयापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे

हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए), डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन (डीबीए) व डीआरटी बार असोसिएशन यांनी वकिलांकडून ही मदत गोळा केली. कोरोनामुळे सर्व न्यायालयांत केवळ तातडीची प्रकरणे ऐकली जात असल्याने ९९ टक्के वकील न्यायालयात येत नाहीत. परिणामी, त्यांच्यापर्यंत मदतीचे आवाहन पोहचविण्यासाठी सोशल मीडियाची मदत घेण्यात आली. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक व ट्विटरवर मदतीचे आवाहन करणारी पोस्ट व्हायरल करण्यात आली. वकिलांनी त्याला प्रतिसाद देत संबंधित बँक खात्यांमध्ये आपापल्या शक्तीनुसार आर्थिक मदत जमा केली. अनेकांनी संघटनांकडे धनादेश नेऊन दिले. सायंकाळपर्यंत मदतीचा आकडा १४ लाख रुपयांवर पोहचला.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

डीबीएचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा यांनी चार लाख रुपयांवर मदत गोळा केल्याची माहिती दिली. आणखी दोन-तीन दिवस मदत स्वीकारू. त्यानंतर गोळा होणाऱ्या एकूण रकमेतील ४० टक्के रक्कम जिल्हाधिकारी यांना व ४० टक्के रक्कम पंतप्रधान मदतनिधीला दिली जाईल तर, २० टक्के रक्कमेतून गरजू वकिलांना मदत करू, अशी माहिती अ‍ॅड. सतुजा यांनी दिली.

डीआरटी बारचे अध्यक्ष अ‍ॅड. अतुल पांडे यांनी पाच लाख रुपयावर रक्कम गोळा झाल्याची व ही संपूर्ण रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करणार असल्याची माहिती दिली. ही संघटना आता मदत स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एचसीबीएचे सचिव अ‍ॅड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी गोळा झालेल्या मदतीची माहिती सध्याच्या परिस्थितीत देण्यास असमर्थता दर्शवली. तसेच, अंतिम मदत स्वीकारल्यानंतर रकमेचा आकडा जाहीर करू, असे सांगितले. परंतु जाणकारांनी या संघटनेकडे पाच लाखावर रुपये जमा झाले असावे, अशी शक्यता व्यक्त केली. कारण यापूर्वी संघटनेने विविध सामाजिक कार्यांसाठी १० लाखापेक्षा जास्तच रक्कम दान दिली आहे.

Advertisement
Advertisement