Published On : Thu, Mar 5th, 2020

‘कोरोना’ची भीती बाळगू नका; काळजी घ्या

मनपा-श्री राधाकृष्ण हॉस्पिटलच्या वतीने चर्चासत्र

नागपूर,: नागपूर महानगर पालिका व श्री राधाकृष्ण हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. ५) श्री राधाकृष्ण हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे ‘कोरोना व्हायरसचा संसर्ग आणि त्या संदर्भात घ्यावयाची काळजी’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी उपमहापौर मनीषा कोठे, परिवहन सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवका मनीषा धावडे, कांता रारोकर, मनपाचे एपिडेमिक ऑफिसर डॉ. गोवर्धन नवखरे, श्री राधाकृष्ण हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च इंस्टिट्यूटचे अध्यक्ष गोविंद पोद्दार, डॉ. भरत अग्रवाल, सं:योजक मधुसूदन सारडा, मनोज अग्रवाल उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या उद्‌घाटिका उपमहापौर मनीषा कोठे म्हणाल्या, कोरोना विषाणूची भीती मनात ठेवू नका. काळजी हाच सर्वोत्तम उपाय आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी वैद्यकीय सल्ल्यानुसार काय करु नये, याची काळजी घ्या, असे आवाहन करतानाच जनतेच्या मनात उगाच भीती राहू नये, यासाठीच अशा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

महानगर पालिकेचे एपिडेमिक ऑफिसर डॉ. गोवर्धन नवखरे व डॉ. भरत अग्रवाल यांनी कोरोना वायरस संसर्ग आणि त्या संदर्भात घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. कोरोना विषाणूवर उपाय सध्या जरी नसला तरी जे प्रतिबंधात्मक उपाय आहे, त्यासाठी नागपुरातील आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. हस्तांदोलन टाळावे, वेळोवेळी चेहऱ्यावर हात फिरवू नये आदी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातील पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांचा संदेश उपस्थितांना ऐकविण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मधुसूदन सारडा यांनी केले. आभार मनोज अग्रवाल यांनी मानले.
यावेळी रामदत्त गोयल, मथुराप्रसाद गोयल, जगदीश गुप्ता, बिसंबर गुप्ता, ऋषी खुंगर, सुनील गुप्ता, चंपालाल मानधना, डॉ. नरेडी, चंदरसुरेश डोंगरवार, महेंद्र कटारिया, विनोद कोचर, कन्हैयालाल मानधना, संतोष लढ्ढा, सुनीता मिगलानी, उषा अग्रवाल, शोभा मनोहर, उषा सारडा, सुखराम निराला, साजिद शेख, ओमप्रकाश शर्मा, नवीन शर्मा कार्यक्रमाला उपस्तित होते.