Published On : Thu, Mar 5th, 2020

जैवविविधता समितीच्या सहकार्याने नागपुरात साकारणार ‘विशेष उद्यान’

समितीच्या बैठकीत चर्चा : मनपाच्या उद्यानातही लावणार विविध प्रजातीची झाडे

नागपूर : नागपूर शहराच्या सभोवताल मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आहे. त्याच्या नोंदी आणि जतन करण्याचा जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या वतीने अभ्यास सुरू आहे. यासंदर्भात अभ्यास करणाऱ्या चमूने सुमारे ३५ प्रकारची बिजे जमा केली आहेत. या बिजांचा उपयोग करून समिती आणि मनपाच्या वतीने एक विशेष उद्यान साकारण्यात येईल, त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिव्या धुरडे यांनी दिले.

जैविक विविधता व्यवस्थापन समितीची बैठक गुरुवारी (ता. ५) नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडली. समितीच्या अध्यक्षा दिव्या धुरडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला समितीचे सदस्य नगरसेविका सोनाली कडू, आशा उईके, वैशाली नारनवरे, उपायुक्त तथा उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, सदस्य दिलीप चिंचमलातपुरे, निसर्ग विज्ञानचे दीपक साहू, जैवविविधता मंडळाचे श्रीरंग मद्दलवार, प्रद्युम्न सहस्त्रभोजनी, माधुरी कानेटकर, निसर्ग विज्ञानचे डॉ. विजय घुगे, पुनर्नवाच्या प्राची माहुरकर, नागपूर जिल्हा मच्छीमार सहकारी संस्थेचे प्रकाश लोणारे, वैज्ञानिक डॉ. व्ही. एम. इलोरकर, मनपाचे सहायक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, कृषी पर्यवेक्षक ए. वाय. बेलूरकर उपस्थित होते.

नागपूर शहराची पहिल्या टप्प्याची लोक जैवविविधता नोंदवही तयार करण्यात आली असून सदर नोंदवही महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाला सादर करण्यात आली. पुढील टप्प्यातील जैवविविधता नोंदवही तयार करण्याच्या विषयावर चर्चा करून त्या विषयाला मंजुरी देण्यात आली. संपूर्ण नागपूर शहरामध्ये जैवविविधता तयार करण्यास्तव काय करायला हवे, यासंदर्भात यावेळी सादरीकरण करण्यात आले.

लोप पावत चाललेल्या प्रजातींची झाडे नागपूर महानगरपालिकांच्या उद्यानात लावण्यात यावी, अशी सूचनाही यावेळी अध्यक्ष दिव्या धुरडे यांनी केली.


नागपूर जैविक विविधता समितीच्या माध्यमातून सध्या जैवविविधतेसंदर्भात सुरू असलेल्या नोंदी ह्या ऑनलाईन व्हाव्या, अशी सूचना उपायुक्त तथा उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार यांनी केली. नागपूर शहरात अशा जैवविविधतेसाठी विशेष उद्यान तयार करण्याचीही सूचना त्यांनी मांडली. अशा उद्यानासाठी जागा निश्चित झाली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ५० लाख रुपयांचे प्रावधान केल्याचेही दिलीप चिंचमलातपुरे यांनी सांगितले. असे उद्यान तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश अध्यक्ष दिव्या धुरडे यांनी दिले.
जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी एप्रिल महिन्यात जैविक विविधता व्यवस्थापन समितीने पचमढी येथे अभ्यास दौरा करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली.