Published On : Thu, Mar 5th, 2020

‘कोरोना’ची अफवा पसरवू नका; भीती बाळगू नका

म.न.पा.आयुक्त यांची वैद्यकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

नागपूर : ‘कोरोना’ या संसर्गातून होणाऱ्या रोगाची कुणीही भीती बाळगू नका, काळजी हाच त्यावरील उपाय आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, सार्वजनिक कार्यक्रमात काही काळ सहभागी होणे टाळा, हस्तांदोलन टाळा, काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा आणि वेळोवेळी तोंडावर हात नेऊ नका आणि कुणीही मास्क वापरू नका, असा संदेश आरोग्य यंत्रणा आणि खासगी डॉक्टर्सच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहचू द्या, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मेंढे यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने पुरेशी खबरदारी घेतली आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी नागपुरातील आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे. नागपुरातील खासगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांनीही यासाठी सज्ज राहावे, यासाठी गुरुवारी (ता. ५) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेत नागपूर महानगरपालिका मुख्यालयाच्या आयुक्त कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांची, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. डी.बी. पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. एस. सेलोकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मानेकर, मनपाचे एपिडेमिक ऑफिसर डॉ. गोवर्धन नवखरे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. सरीता कामदार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांच्यासह विविध वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, नागपूर शहरात या व्हायरसचा शिरकाव होऊ नये, यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मेडिकल आणि मेयोचे अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची समिती तयार करण्यात आली आहे. या समितीने संबंधित यंत्रणेला आवश्यक ते निर्देश दिलेले आहे

विमानतळावर तपासणीची सोय करण्यात आली आहे. विमानाची साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पुरेशी खबरदारी बाळगण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. चार दिवसावर असलेल्या होळीच्या उत्सवावर लोकांनी एकत्र होळी साजरी न करता स्वत:च्या घरी साजरी करावी, असेही त्यांनी आवाहन केले.


कोरोनाबाबतच्या जाणीव जागृतीसाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणावर मोहिम हाती घेण्यात आली असून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यासंदर्भात फलक लावण्यात आलेले आहेत. महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मीडियावरून यासंदर्भातील माहिती आणि घ्यावयाची काळजी याबाबत जागृती करण्यात येत आहे. नागपूर शहरातील प्रत्येक शाळांमध्येही तातडीने जनजागृतीचे फलक लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीला नागपूर ॲबास्टट्रिक गायनॉकोलॉजीस्ट असोशिएशनच्या अध्यक्ष डॉ. वैदेही मराठे, बालरोग तज्ज्ञ अकादमीच्या अध्यक्ष डॉ. शुभदा खिरवडकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला, उपाध्यक्ष डॉ. प्रकाश देव, प्रसूती व स्त्री रोग संघटनेच्या अध्यक्ष डॉ. प्रियंका कांबळे, डॉ. अर्चना कोठारे, डॉ. मंजुषा गिरी, निमाचे कोषाध्यक्ष डॉ. विनोद गंभीर, ऑल इंडिया युनानी तिब्बी काँग्रेसचे डॉ. अब्दुल अझीझ, डॉ. मोहम्मद हसन आदी उपस्थित होते.

– तर करा तक्रार
कोरोनावर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून आवश्यक असलेल्या औषधींचा पुरेसा साठा नागपुरात उपलब्ध आहेत. मेडिकल स्टोअर्समधून जर यासंदर्भातील औषधी अधिक दराने विकल्या जात असेल तर जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मेंढे यांनी केले आहे.

– मेडिकलमध्ये विशेष वार्ड
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (मेडिकल) आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात करण्यात आला आहे. येथे सात खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास त्यात वाढ करण्यात येईल, शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कुठल्या खासगी रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डची व्यवस्था असेल तर त्याची माहिती देण्याचे आवाहनही आयुक्तांनी वैद्यकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केले.

मास्क वापरु नका
अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होते. जो रुग्ण बाधीत आहे, त्यालाच केवळ मास्कची आवश्यकता आहे. तो जेथे दाखल असेल त्या रुग्णालयात ती व्यवस्था असेल. नागरिकांनी मात्र, मास्कचा वापर करू नये, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. मास्कचा वापर केल्यास वेळोवेळी हात चेहऱ्यावर जाईल. त्यामुळे विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते, असे त्यांनी सांगितले.

‘कोरोना’ची लक्षणे

– ताप येणे

– घशाला कोरड पडणे

– अंग दुखणे

– सर्दी होणे

काय काळजी घ्याल?

– जेवणापूर्वी तसेच वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत

– अन्न शिजवून खावे

– पुरेसे पाणी प्यावे आणि पोषक आहार घ्यावा

– पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी

– आजारी आणि सतत शिंकत असलेल्या व्यक्तीपासून तीन फूट दूर राहावे

काय करु नये

– सार्वजनिक ठिकाणी आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

– अस्वच्छ हात वेळोवेळी तोंडाला लावू नका

– मिठी मारणे, हस्तांदोलन करणे टाळा

– सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, भिंती, पायऱ्यावरील कठडे आदींना स्पर्श करणे टाळा

– वापरलेले रूमाल, टिश्यू पेपर उघड्यावर टाकणे टाळा