Published On : Mon, Jun 12th, 2017

विधी समितीचे कार्य समन्वयाने करू : मिनाक्षी तेलगोटे

Advertisement


नागपूर:
महानगरपालिकेशी संबंधित न्यायालयात असलेली प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर कशी मार्गी लागतील याकडे विशेष लक्ष देत समिती सदस्य आणि अधिकारी यांच्या समन्वयातून कामाला गती देऊ, असे प्रतिपादन मनपा विधी विशेष समितीच्या सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे यांनी केले.

विधी विशेष समितीच्या पहिल्या आढावा बैठकीचे आयोजन सोमवार १२ जून रोजी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात करण्यात आले होते. त्यात त्या बोलत होत्या. बैठकीला समितीच्या उपसभापती विशाखा मोहोड, समिती सदस्य महेश महाजन, अमर बागडे, श्रीमती अभिरुची राजगिरे, समिता चकोले, हर्षला साबळे, जितेंद्र घोडेस्वार यांच्यासह सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, व्यवहार व न्याअभियोक्ता व्यंकटेश कपले, प्रकाश बरडे, सहायक अधिकारी श्री. पाचोरे उपस्थित होते.

यावेळी न्यायअभियोक्ता व्यंकटेश कपले यांनी विधी समितीच्या कामकाजाविषयीची सविस्तर माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात, जिल्हा न्यायालयात महापालिकेशी संबंधित किती प्रकरणे प्रलंबित आहेत, विधी विभागाच्या पॅनलवर कोण-कोण आहेत याबाबत सविस्तर सांगितले. सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी विधी समितीवर नियुक्त नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले. विधी समितीअंतर्गत चालणाऱ्या कामाकाजाची माहिती त्यांनी करवून दिली. यावर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.

सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे यांनी समितीच्या कामकाजाची माहिती जाणून घेतल्यानंतर प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर कशी मार्गी लावता येतील, याबाबत चर्चा करून त्या दिशेने कार्य करू, असे सांगितले.