
नागपूर – न्यू इंदोरा परिसरात घराच्या बांधकामासाठी वाळू उतरवण्यावरून सुरू झालेला किरकोळ वाद थेट हिंसक संघर्षात रूपांतरित झाला. शेजारील कुटुंबाने एका तरुणी व तिच्या वृद्ध वडिलांवर काठी-दांडक्यांनी हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यू इंदोरा येथील ट्विंकल शेंडे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. शुक्रवारी घरासमोर वाळूने भरलेला ट्रक खाली करण्यात येत असताना शेजारी संदीप मानवटकर तेथे आला. यावेळी त्याने शिवीगाळ करत वाद घातला. वाद वाढल्यानंतर ट्विंकलसोबत गैरवर्तन करत मारहाण केल्याचा आरोप आहे.
गोंधळाचा आवाज ऐकून ६८ वर्षीय वडील नरेंद्र शेंडे मध्यस्थीसाठी धावले. मात्र, संदीप मानवटकरने पत्नी राखीच्या मदतीने त्यांच्यावर काठीने सपासप वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात नरेंद्र शेंडे गंभीर जखमी झाले असून ट्विंकललाही दुखापत झाली आहे. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पीडितांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात मारहाण व जीवघेण्या हल्ल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.










