
मुंबई – महाराष्ट्रात राजकारण पुन्हा एकदा मोठ्या वळणावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात वाढलेल्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे. यामुळे शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त होत असून, काही मंत्र्यांनी तर मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कारही घातला होता.
या घडामोडींनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा जोर धरली की, येत्या १-२ महिन्यांत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा दावा करू शकतात.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात थेट भविष्यवाणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शिंदे यांनी पुन्हा आपली सत्ता दाखवून देण्यासाठी योग्य युक्ती केली आहे. “अमित शाह यांना खिशात घालणे ही त्यांची किमया आहे,” असे आंबेडकर यांनी नमूद केले. शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची युती महापालिका निवडणुका एकत्र लढण्यासाठी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आंबेडकर यांच्या मते, विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री केले गेले नाही, त्याचा तो बदला घेण्यासाठी पुढील काळात पुन्हा ते मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करतील.
तसेच त्यांनी शरद पवार यांना चाणक्य म्हणून वर्णन करत, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात नुकतीच झालेली बैठक राजकीय संदेशांनी भरलेली असल्याचेही स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांची सत्तेची लढाई आणि आगामी महापालिका निवडणुका महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे उलथापालथ घडवून आणू शकतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.










