
नागपूर— संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार व निरोगी रोपे उपलब्ध व्हावीत, यासाठी राज्यातील नर्सरी (रोपवाटिका) व्यवस्था सक्षम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कृषिमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांनी या संदर्भात लवकरच अध्यादेश काढण्याचे निर्देश दिले.
रविवारी पार पडलेल्या या संयुक्त बैठकीत अॅग्रोव्हिजनची संत्रा नर्सरी धोरण समिती, राज्याचा कृषी व फलोत्पादन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (पीकेव्ही) आणि एनआरसीसी यांचा सहभाग होता. बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ, आमदार व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी ना. नितीन गडकरी म्हणाले की, फळांचे रोपमळे (नियमन) अधिनियम, 1969 अंतर्गत शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण रोपे मिळणे अत्यावश्यक आहे. फळबाग उभी राहण्यासाठी चार-पाच वर्षांचा कालावधी लागतो; मात्र प्रारंभिक रोपे निकृष्ट असतील तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे उत्तम रोपमुळे निर्मिती आणि नर्सरींचे दर्जात्मक नियमन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अॅग्रोव्हिजन समिती व तज्ज्ञ शेतकऱ्यांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करून कृषी विभाग आणि पीकेव्हीच्या माध्यमातून दर्जेदार रोपवाटिका व रोपमळे याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या चर्चेनुसार, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि नर्सरी नियोजन सुदृढ करण्यासाठी आवश्यक सुधारणा करून अध्यादेश काढण्याच्या सूचना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या निर्णयामुळे विदर्भातील संत्रा उत्पादकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा असून, गुणवत्तापूर्ण रोपांची उपलब्धता आणि उत्पादनवाढ यास चालना मिळणार आहे.









