Published On : Mon, Mar 11th, 2019

सर्व धार्मिक स्थळांच्या परिसरात संविधान उद्देशिका शिलालेखाची निर्मिती व्हावी

Advertisement

भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई : इंदोरा बुद्ध विहार परिसरात शिलालेख कार्याचे भूमिपूजन

नागपूर: भारतीय संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले. संविधानाने सर्व जाती, धर्म, पंथांना एकत्र गुंफले आहे. आपल्या संविधानामुळेच देश चालतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची जोपासना संविधानानेच केली आहे. संविधानामुळे आपल्याला मिळालेल्या अधिकारांची जाणीव प्रत्येक नागरिकाला व्हावी, यासाठी सर्व धार्मिक स्थळांच्या परिसरात संविधान उद्देशिका शिलालेखाची निर्मिती व्हावी, असे प्रतिपादन दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष बौद्ध धम्मगुरू भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेतर्फे इंदोरा बुद्ध विहार परिसरात १६ फुट उंचीचे संविधान उद्देशिका शिलालेख व राजमुद्रा असलेल्या अशोक स्तंभाच्या निर्मिती कार्याचे भूमिपूजन रविवारी (ता.१०) भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नगरसेवक किशोर जिचकार, नगरसेवक नरेंद्र वालदे, नगरसेविका ममता सहारे, नगरसेविका स्नेहा निकोसे, मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, इंदोरा बौद्ध विहार कार्यकारिणीचे उपाध्यक्ष ॲङ भास्कर धमगाये, सचिव अमित गडपायले, सहसचिव अरुण नागदिवे, ॲङ अजय निकोसे, महिला समितीच्या शकुंतला कोल्हटकर, विजय इंदुरकर, सुनील अंडरसहारे, आनंद राऊत, मनोरमा खोब्रागडे, गिता चवरे, शांता इंदुरकर, भन्ते नागघोष उपस्थित होते.

संविधानामुळेच आज भारतात समानता नांदत आहे. अनेक बाबतीत विविधता असूनही देशातील प्रत्येक नागरिकाला स्वाभिमान प्रदान करणारे हक्क संविधानाने प्रत्येकाला बहाल केले आहे, ही देशातील प्रत्येकासाठी गौरवशाली बाब आहे. अशा संविधानाबाबत जाणीव जागृती व्हावी, यासाठी आज नागपूर शहरात अनेक ठिकाणी संविधान उद्देशिका शिलालेखाची निर्मिती केली जात आहे. ही अभिनंदनीय बाब आहे. मात्र या सोबतच प्रत्येक धार्मिक स्थळांच्या परिसरात संविधान उद्देशिका शिलालेखाची निर्मिती करून संविधानाबाबत जागृती करण्यात यावी, असेही भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यावेळी म्हणाले.


प्रसिद्ध वास्तुविशारद उदयदत्त गजभिये यांनी या स्तंभाची डिझाईन तयार केली. दिनेश मस्के हे स्तंभाच्या कामाचे कंत्राटदार आहेत. यावेळी भन्ते नागधाम, राजेश ढोक, प्रसनजीत डोंगरे, भन्ते भिमबोधी, अकेश उके, शिशुपाल कोल्हटकर, महेश सहारे, सिद्धार्थ धमगाये यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंदोरा बौद्ध विहार कार्यकारिणीचे सचिव अमित गडपायले यांनी केले. संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले तर आभार अरुण नागदिवे यांनी मानले.