नागपूर : मतदान यादीतील गोंधळावरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून निवडणूक आयोगासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर थेट “मतदानात चोरी”चा आरोप केल्यानंतर पक्षाने देशभर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनाचा पहिला टप्पा महाराष्ट्रात ३ सप्टेंबर रोजी होणार असून नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा क्षेत्रातून याची सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात सर्व प्रमुख नेते सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसतर्फे देण्यात आली आहे.
शनिवारी शहरातील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे खासदार श्याम बर्वे यांनी ही घोषणा केली. यावेळी माजी मंत्री सुनील केदार, आमदार अभिजीत वंजारी, प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
या आंदोलनावेळी हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह सर्व जिल्हास्तरीय व प्रदेशस्तरीय नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.