Published On : Sat, Jan 27th, 2018

माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना काँग्रेसची नोटीस

Satish Chaturvedi
नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे करणे तसेच पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका ठेवत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना शहर काँग्रेसतर्फे कारणे दाखवा नोटीस बजावून सात दिवसात स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेसच्या निर्देशावरून २५ जानेवारी रोजी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटिसीनंतर काँग्रेसमध्ये वादळ उठले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसात चतुर्वेदी यांच्यावर पक्षातर्फे कारवाई होण्याचे संकेत आहेत.

चतुर्वेदी यांना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये प्रभागांतर्गत निवडणूक लढविणारे काँग्रेसचे बंडखोर व त्यांना मदत करण्यात आल्याचा उल्लेख आहे. या नोटीसमध्ये चतुर्वेदी यांना उद्देशून म्हटले आहे की, आपण पक्षाचे वरिष्ठ नेते व मंत्रीही राहिले आहात. असे असतानाही आपण काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरांना मदत केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत वादविवाद निर्माण करणे, बंडखोरांना मदत करणे असे प्रमुख आरोपही लावण्यात आले आहे. प्रभाग ३० मध्ये अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या दीपक कापसे यांना बंडखोरीसाठी भडकविण्यात आल्याचा आरोपही चतुर्वेदी यांच्यावर करण्यात आला आहे. प्रभाग २४ मध्ये उघडपणे भाजपा उमेदवारांची मदत करण्यात आली. प्रभाग क्रमांक ४ मध्ये काँग्रेसच्या बंडखोर सूर्यकांता नायडू, संजय कडू, ललिता साहू, रामदास साहू यांचा गट तयार करण्यात आला. प्रभाग ३१ व २३ मध्ये देखील काँग्रेस विरोधात काम केले. उघडपणे बंडखोर उमेदवारांचा प्रचार केला. याशिवाय बºयाच कालावधीपासून पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोपही चतुर्वेदी यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व सतीश चतुर्वेदी यांच्यात उघड गटबाजी पहायला मिळाली. महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे कार्यक्रम वेगवेगळे झाले. आंदोलने वेगवेगळी झाली. पक्षाच्या स्थापना दिवस कार्यक्रमाला चतुर्वेदी अनुपस्थित होते. पूर्व नागपुरात आयोजित प्रचार सभेत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यात आली. निवडणुकीनंतर गटनेता निवडीच्या प्रक्रियेतही काँग्रेसमध्ये दुफळी पडली. विरोधी गटाच्या नगरसेवकांच्या बैठका सातत्याने चतुर्वेदी यांच्या बंगल्यावर झाल्या. या सर्व पार्श्वभूमीवर चतुर्वेदी यांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चतुर्वेदी काँग्रेसमध्ये मुरलेले नेते आहेत. गटनेता निवडीत तानाजी वनवे यांच्या बाजूने मतदान करणाऱ्या नगरसेवकांनाही शहर काँग्रेसने नोटीस बजावली होती. मात्र, एकाही नगरसेवकाने त्यावर स्पष्टीकरण दिले नव्हते. आता या नोटिसीनंतर चतुर्वेदी हे काय भूमिका घेतात याकडे काँग्रेस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या बंडखोरांना मदत केल्याचा आरोप
महापालिकेच्या निवडणुकीत बंडखोर उमेदवारांना मदत केल्याचा आरोप सतीश चतुर्वेदी यांच्यावर करण्यात आला आहे. यात ममता विश्वास गेडाम, फिलीप जार्ज जैस्वाल, लक्ष्मी नारायण धुर्वे, अरुण डवरे, पंकज सुरेंद्र शुक्ला, राजेश जरगर, नफिशा अहमद, किशोर सिरपूरकर, विद्या लोणारे, अंगद हिरोंदे, कुमुदिनी कैकाडे, हरीश रामटेके, कुसुमताई बावनकर, सुभाष खोडे, दीपक कापसे, सुमन अग्ने, निर्मला रामू घाडगे आदींचा समावेश आहे.

प्रदेश काँग्रेसच्या निर्देशावर नोटीस : विकास ठाकरे
या नोटीसबाबत विचारणा केली असता शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, चतुर्वेदी यांच्याबाबत प्रदेश काँग्रेसकडे विविध तक्रारी प्राप्त झाल्या. त्यांची दखल घेत प्रदेश काँग्रेसने शहर काँग्रेसला पत्र पाठवून चतुर्वेदी यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. आणखी दुसऱ्या कोणत्या नेत्यांना अशी नोटीस बजावली आहे का, अशी विचारणा केली असता त्यांनी ही पक्षांतर्गत बाब असल्याचे सांगत उत्तर देणे टाळले.

शहर काँग्रेसला अधिकार नाहीत : सतीश चतुर्वेदी
या प्रकरणाबाबत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी म्हणाले, मला काँग्रेसकडून कुठलीही नोटीस मिळालेली नाही. तसेही शहर काँग्रेसला नोटीस पाठविण्याचा अधिकार नाही. कारण, तिचे अस्तित्व संपले आहे. काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकींतर्गत शहर काँग्रेसची निवडणूक रद्द झाली आहे. अशा परिस्थितीत शहर काँग्रेसने त्यांना नोटीस देणे बालिशपणा आहे. केवळ चर्चेत राहण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. नुकतेच शहर काँग्रेसने विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीवरून १५ नगरसेवकांना नोटीस बजावली होती. मात्र, त्याचा कुणावरही काहीच परिणाम झाला नाही. आता दीड वर्षांनी होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला फायदा पोहचविण्यासाठी ही नोटीस जारी करण्यात आल्याचा आरोपही चतुर्वेदी यांनी केला.