Published On : Fri, Mar 9th, 2018

भोपळा अन् कोऱ्या पाट्या घेऊन काँग्रेस आमदारांची निदर्शने

Opposition with Pumpkin

मुंबई: राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प निराशाजनक असल्यामुळे अर्थमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर काँग्रेस आमदारांनी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भोपळा अन् कोऱ्या पाट्या घेऊन जोरदार निदर्शने केली.

या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भोपळा मिळाल्याचे सांगून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक भोपळा हातात घेऊन नारेबाजी केली व आपला असंतोष व्यक्त केला. तर इतर आमदारांनीही हातात कोऱ्या पाट्या घेतलेल्या होत्या. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील सर्वच समाजघटकांची पाटी कोरी राहिल्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून या आमदारांनी हातात कोऱ्या पाट्या घेतलेल्या होत्या.

“महाराष्ट्राला काय मिळाले?… भोपळा… भोपळा”, “सरकारची आश्वासने निघाली खोटी, सर्वसामान्यांची कोरी पाटी… कोरी पाटी” या काँग्रेस आमदारांच्या घोषणांनी विधानभवन दुमदुमले होते.