Published On : Fri, Mar 9th, 2018

ऊर्जाक्षेत्र मजबूत व रोजगार निर्मिती करणारा अर्थसंकल्प – ऊर्जा मंत्री बावनकुळे

Advertisement

Maharashtra Energy Minister Chandrashekhar Bawankule
मुंबई: शासनाच्या विविध योजना व प्रकल्पातून रोजगार निर्मिती करणारा तसेच ऊर्जा क्षेत्राला मजबूत करणारा व सौर ऊर्जेला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

कृषी क्षेत्रासाठी विविध योजना जाहीर करून शेतकऱ्यांचे उत्पादनवाढीचे प्रयत्न या अंदाजपत्रकातून करण्यात आला आहे. बेरोजगार तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या व उद्योजक तरुणांना उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विचार अर्थसंकल्पात करण्यात आलं आहे.

उर्जाक्षेत्र मजबूत करण्याच्या दृष्टीने ऊर्जा विभागासाठी 7235 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात अर्थमंत्रांनी केली आहे. विजेच्या पायाभूत सुविधांसाठी 365 कोटी, कृषिपंपाचा अनुशेष भरून काढण्यासाठी 50 कोटी, विदर्भ मराठवाडा कृषिपंपाच्या विद्दुतीकरणासाठी 700 कोटी , कृषी व यंत्रमाग विषयक प्रशुल्क कमी करण्यासाठी महावितरणला 4941 कोटीच्या अर्थसहाय्यची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

महानिर्मितीद्वारे राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी 404 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात कोराडी युनिट 6 चे आधुनिकरण, भुसावळ प्रकल्पात भांडवली गुंतवणूक, सौर ऊर्जा प्रकल्पात भांडवली गुंतवणूक (200 कोटी) या प्रकल्पांचा समावेश आहे, असे ही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.

अर्थमंत्र्यांनी आपल्या अंदाजपत्रकातून सौर ऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. महाऊर्जाला अर्थसहाय्य म्हणून 106 कोटी, ग्रीन सेस फंडासाठी 504 कोटी, अटल सौर कृषीपंपासाठी 31 कोटींची तरतूद करुन सौर ऊर्जा प्रकल्पांना अर्थमंत्र्यांनी चालना दिली आहे.

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा-मोसंबी पिकाला भाव मिळावा म्हणून अमरावती, नागपूर व अकोला येथे “सिट्रस इस्टेट” ही संकल्पना राबवण्याचा शासनाचा निर्णय अभिनंदनीय आहे. यासाठी 15 कोटींची भारीव तरतूद अर्थमंत्र्यांनी केली आहे. जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी अनुक्रमे 1500 कोटी व 160 कोटींची तरतुद करुन अर्थमंत्र्यांनी दुष्काळावर मात करण्याची तयारी दर्शवली आहे.

तसेच 150 कोटींच्या रामटेक विकास आराखड्यास मंजूरी देवून त्यासाठीची 25 कोटी इतका नियतव्यय राखून ठेवण्यात आलं आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, गोरेवाडा प्राणी संग्रहालयासाठी 20 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पातील उल्लेखनीय बाबी असल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.