नवी दिल्ली : तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने युद्ध पातळीवर तयारी सुरु केली आहे. पुढील महिन्यात 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी कॉंग्रेसने रविवारी (15 ऑक्टोबर) आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात कॉंग्रेसने 500 रुपयांना एलपीजी सिलिंडर, मुलींना लग्नाच्या वेळी दहा ग्रॅम सोने, एक लाख रुपये रोख आणि विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेट देण्यासारखी आश्वासने दिली आहे.
तेलंगणा प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या मॅनिफेस्टो कमिटीचे अध्यक्ष डी श्रीधर बाबू म्हणाले की, सध्याचे विद्यमान सरकार कल्याण लक्ष्मी आणि शादी मुबारक योजना चालवत आहे. या योजनांतंर्गत, तेलंगणातील रहिवासी असलेल्या आणि लग्नाच्या वेळी 18 वर्षे पूर्ण केलेल्या मुलींना, ज्यांची कौटुंबिक उत्पन्न प्रती वर्ष 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही, अशांना 1,00,116 रुपयांची आर्थिक मदत देत आहे. परंतु आम्ही 1 लाख रुपयांच्या रोख व्यतिरिक्त, पक्षाच्या “महालक्ष्मी’ हमी अंतर्गत सोने देऊ. याशिवाय महिलांना दरमहा 2,500 रुपयांची आर्थिक मदत आणि महिलांना राज्य परिवहन बसमध्ये मोफत प्रवास करण्याचे आश्वासन दिले. तसेच मुलींना एक तोळा सोने (दहा ग्रॅम) दिले जाईल.
या सोन्याची किंमत सुमारे 50,000 ते 55,000 रुपये असेल. याशिवाय जाहीरनामा समितीच्या एका सदस्याने सांगितले की, पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात विद्यार्थ्यांसाठी मोफत इंटरनेटचाही समावेश करण्याची योजना आखली आहे. सत्तेत आल्यानंतर आम्ही इंटरनेट सेवा पुरवठादारांशी बोलू आणि त्यासंबंधी निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.