
नागपूर — नागपूर महानगरपालिकेतील राजकीय घडामोडींमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पुढाकार घेत ‘नागपूर महाविकास आघाडी’ची नोंदणी सर्वप्रथम विभागीय आयुक्त कार्यालयात केली. आघाडीची नोंदणी करणारा काँग्रेस हा पहिला प्रमुख पक्ष ठरला असून, यामुळे पक्षाची संघटनात्मक बांधिलकी, शिस्त आणि स्पष्ट नेतृत्व अधोरेखित झाले आहे.
या प्रसंगी काँग्रेसचे सर्व ३४ नगरसेवक एकत्र उपस्थित होते. पक्षांतर्गत एकजूट आणि नेतृत्वावरचा विश्वास याचे हे ठोस उदाहरण मानले जात आहे. यावेळी नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे, विधानपरिषदेचे आमदार अभिजीत वंजारी, तसेच गिरीश पांडव आणि कुणाल राऊत यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
नगरसेवकांच्या बैठकीत सर्वानुमते श्री. संजय मधुकर महाकाळकर यांची ‘गटनेते’ म्हणून निवड करण्यात आली. चार वेळा नगरसेवक राहिलेल्या महाकाळकर यांच्या अनुभवाला पक्षाने प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे ही निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तात्काळ अधिकृत मान्यता देत पक्षातील लोकशाही परंपरेचा प्रत्यय दिला आहे.
निवडणुकीपूर्वी आणि नंतरही काँग्रेसमधील नेते, कार्यकर्ते व नगरसेवक एकत्रितपणे कार्यरत असल्याचे चित्र असून, ही एकजूट सध्या शहराच्या राजकारणात लक्षवेधी ठरत आहे. नागपूरकरांकडून या ठाम भूमिकेचे कौतुक होत असून, काँग्रेस एक भक्कम व स्थिर पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
‘नागपूर महाविकास आघाडी’ या नावाने स्थापन झालेल्या या गटामध्ये इतर धर्मनिरपेक्ष पक्षांतील नगरसेवक सहभागी होण्यास इच्छुक असल्याची चर्चा असून, त्यामुळे येत्या काळात ही आघाडी अधिक व्यापक आणि प्रभावी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








