Published On : Thu, Sep 13th, 2018

नागपूरचे काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासह कार्यकर्ते हुक्का पार्लरमध्ये

Advertisement

नागपूर : सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्ती समाजासाठी आदर्शवत असाव्यात. कारण त्यांच्या व्यवहाराचा परिणाम अप्रत्यक्षपणे समाजावर होत असतो. मात्र मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हुक्का पार्लरमध्ये युवक काँग्रेसचे अखिल भारतीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके हे कार्यकर्त्यांसह दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांनी हुक्का पार्लरचे सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहे.

डीसीपी नीलेश भरणे हे मंगळवारी नाईट राऊंडवर होते. त्यांना सदर छावणी येथील विंड अ‍ॅण्ड वूड्स रेस्टॉरंट आणि अंबाझरीतील हवेली रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्लर रात्री १ वाजतानंतरही सुरु असल्याची माहिती मिळाली. यानंतर डीसीपी भरणे यांनी सदर पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले.

सदर पोलिसांनी राजनगर येथे संचालित रवींदर सिंह रंधकच्या पार्लवर धाड टाकली. तेव्हा दहा अल्पवयीन मुलेही सापडली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी धाड टाकली तेव्हा काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके हे आपले मित्र व कार्यकर्त्यांसोबत पार्लरमध्ये आढळून आले. तसेच अंबाझरी येथील हवेली रेस्ेॉरंटमधील हुक्का पार्लरविरुद्धही कारवाई करण्यात आली. सदर येथील रंधक आणि अंबाझरी येथील प्रेम जोरनकर व सुमीत गोपाळे यांच्याविरुद्ध ३३ आर डब्ल्यू ,१३५ मपोका अन्वये चालानची कारवाई करण्यात आली. तसेच अल्पवयीन मुलांचे ओळखपत्रही जप्त करण्यात आले.

लोकप्रतिनिधी काय प्रबोधन करणार ?
हुक्का पार्लरमुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे. यापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी असलेले काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्यासारखी व्यक्ती अशा ठिकाणी सापडणे हे कितपत योग्य आहे. लोकप्रतिनिधी यातून कोणते मार्गदर्शन करू इच्छितात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या घटनेनंतर काँग्रेस नेते शेळके यांच्यावर काय कारवाई करतात याकडेही लक्ष लागले आहे.