Published On : Fri, Nov 5th, 2021

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांची कृती व वक्तव्य बालिशपणाचे : ऍड. धर्मपाल मेश्राम

नागपूर : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले असून त्यांना महाराष्ट्रातील जनतेशी काहीही देणेघेणे उरलेले नाही. स्वतःची खडगी भरण्यातच ते व्यस्त असल्याचे सर्वश्रुत आहे. भ्रष्टाचाराचे अनेक कागदोपत्री पुरावे किरीट सोमय्या यांनी दिलेले असताना अतुल लोंढे यांनी पोलिस तक्रार करणे, वक्तव्य प्रसिद्ध करणे ही त्यांची कृती आणि वक्तव्य अत्यंत बालिशपणाचे असल्याचा आरोप भाजपा प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

एका मुलाखती दरम्यान किरीट सोमय्या राज्य सरकारकडे वसुलीचा जो पैसा येतो, त्यातील ४० टक्के राष्ट्रवादी कॉंग्रेसला, ४० टक्के शिवसेनेला आणि २० टक्के हिस्सा कॉंग्रेसला जातो, असा आरोप केला असल्याचे लोंढे यांचे म्हणने आहे. सोमय्या यांच्या या कथित विधानाविरूद्ध अतुल लोंढे यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली व न्यायालयात जाण्याची धमकीही दिली. या संपूर्ण कृतीचा भाजपाचे प्रदेश सचिव ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून समाचार घेतला.

ते म्हणाले, काँग्रेसचे माजी मुख्य प्रवक्ते सचिन सावंत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नियुक्त केलेले अतुल लोंढे यांचे मुख्य प्रवक्ता पदासाठी वाद आहे. अशात लोंढे यांनी मुख्य प्रवक्ता पदाचे महत्व समजून न घेता केवळ आपली उपस्थिती दाखविण्याच्या नादात अशा प्रकारचा आरोप करणे आणि न्यायालयात जाण्याची धमकी देणे किंवा पोलिस आयुक्तांकडे तक्रार हे त्यांना राजकीय शहाणपणा व समज नसल्याचे उत्तम उदाहरण आहे.

महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाच्या आघाडीचे सरकार असून देखील त्यांनी सरकारकडे कारवाईची मागणी न करता न्यायालयात जाण्याची धमकी देणे ही बाब म्हणजे सरकारवर त्यांचा स्वत:चा भरवसा नसल्याचे त्यांनी त्यांच्या ह्या कृतीतून सिद्ध केल्याचे निदर्शनास येत असल्याचा टोलाही ऍड. मेश्राम यांनी लगावला.